पश्चिम बगलरस्ता स्टील्टवर नेण्याच्या मागणीसंदर्भात गोवा फॉरवर्ड अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी दिलेली माहिती
मडगाव : वेस्टर्न बायपास रस्त्याचा बाणावली येथील भाग स्टिल्टवर करण्याच्या मागणीची स्वत: पाहणी करून शहानिशा करण्यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचे तांत्रिक सल्लागार आर. के. पांडे हे गोव्यात येणार अशी माहिती गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी गोंयकार घर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली. आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांना पश्र्चिम बगलरस्ता स्टील्टवरच हवा याबद्दल आग्रह धरला. या भेटीच्या वेळी त्यांचे तांत्रिक सल्लागार पांडे यांनी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या मध्यास, जेव्हा जोराचा पाऊस पडतो तेव्हा खरी परिस्थिती जाणून घेण्यासाठी गोव्यात येऊन पश्चिम बगलरस्त्याची पाहणी करावी, असे ठरले आहे. तांत्रिक सल्लागाराच्या पाहणीनंतरच पश्चिम बगलरस्त्यासंदर्भात निर्णय शक्य आहे, असे सरदेसाई यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री गडकरी यांनी याबाबतीत सकारात्मकता दाखवली असून केवळ तांत्रिक सल्लागारांच्या पाहणीनंतर निर्णय घेऊ असे स्पष्ट केले असल्याचे सरदेसाई यानी सांगितले. केवळ आर्थिक अडचणीमुळे जर बाणावली भागाचा स्टील्टवरील रस्ता अडत असेल, तर या संपूर्ण प्रकल्पासाठी 16 हजार 500 कोटी ऊपये खर्च केले जात असताना केवळ 50 कोटी ऊपयांसाठी स्टील्टवरील रस्ता अडून राहता कामा नये. हे आपण त्यांना पटवून दिले आहे, असे सरदेसाई यांनी सांगितले. जलस्रोत खात्याचे अभियंते साईनाथ जामखंडी यांनी गत साली पावसाळ्यात या भागात पूर आल्यावर अहवाल तयार केला होता व हायड्रोलॉजिस्टतर्फे अभ्यासाची शिफारस केली होती. मात्र राज्य सरकारने किंवा संबंधित खात्याने या अहवालाची दखल घेतलेली नाही. 19 जून रोजी उच्च न्यायालयात पश्चिम बगलरस्त्यासंदर्भात सुनावणी आहे. तेव्हा हा अहवाल न्यायालयाच्या लक्षात आणून दिला पाहिजे. या अहवालाच्या आधारेच स्टील्टवरील पश्चिम बगलरस्त्याच्या मागणीला मजबुती येईल, असे सरदेसाई म्हणाले, आपण केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली त्यामध्ये कसलाही राजकीय हेतू किंवा स्वार्थ नव्हता. केवळ शेवटचा प्रयत्न म्हणून आपण त्यांची भेट घेतली व भेटीपूर्वी सर्व संबंधितांशी चर्चा केली होती. केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीनंतर आपण मुख्यमंत्र्यांशी सुद्धा बोललो व या भेटीत नेमके काय चर्चा झाली व पुढील उपाययोजना कशी असावी हे त्यांना सविस्तरपणे सांगितले आहे. स्टील्टवरील पश्चिम बगलरस्त्यासाठी आपणासह मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाममंत्री, सरपंच, पंच सर्वांनीच आपल्या परीने प्रयत्न केले आहेत. पण आता सर्व संबंधितांना एकत्र येऊनच ही मागणी पुढे न्यावी लागेल, असे सरदेसाई यांनी सूचविले.
‘एम्स’च्या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद नाही
केंद्रीय आरोग्यमंत्र्याची भेट घेऊन त्यांच्याकडे दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात एम्स सुरू करण्याची आम्ही मागणी केली आहे. सदर इस्पितळ आपल्या घरापासून हांकेच्या अंतरावर आहे व येथून सासष्टीसह संपूर्ण दक्षिणेतील रुग्णांना कसे आवश्यक उपचारांविना बांबोळीतील गोमेकॉत पाठविले जाते हे आम्ही जवळून पाहत आहोत. येथे खासगी कॉलेज सुरू करण्यास आमचा तीव्र विरोध असून प्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची तयारी ठेवली असल्याचे केंद्रीय मंत्र्यांच्या नजरेस आणून दिले आहे. त्यांच्याकडून या विषयावर सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नसून राज्यपातळीवर यासंदर्भात निर्णय घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे, असे सरदेसाई यांनी सांगितले.









