कार्यालयासमोरच वाहने पार्किंग; अधिकारी लक्ष देणार का?
बेळगाव : जिल्हा पंचायतसमोर वाहतूक कोंडी ही नित्याचीच ठरली आहे. मात्र याकडे सोयिस्कर दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. काही अधिकाऱ्यांचे वाहनचालक रस्त्याला लागूनच पार्किंग करत असल्याने वाहतूक कोंडीत अधिक भर पडत आहे. दरम्यान, जिल्हा पंचायतमध्ये येणाऱ्यांची संख्या अधिक असते. वाहने कार्यालयासमोरच पार्किंग केली जात आहेत. त्यामुळे ये-जा करताना सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सोमवारी जिल्हा पंचायतसमोर वाहतूक कोंडी झाल्याने अनेकजण अडकून पडले होते. काहीजण तर वाहनांत गाणी ऐकत होते. त्यामुळे अनेकांनी अशांना हटकून वाहन बाजूला घेण्याच्या सूचना केल्या. तरीही त्यांच्यावरच दादागिरी करण्याचे प्रकार सुरू होते. आम्ही कोण आहे माहिती आहे का? आमचे साहेब कोण आहेत माहिती नाही का? अशी दादागिरी करण्यात येत होती. त्यामुळे जिल्हा पंचायतसमोर वाहने पार्किंग केल्यामुळे मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. यावेळी जिल्हा पंचायतीसमोर वादावादीचे प्रकारही घडले. मात्र अधिकाऱ्यांना व संबंधित कारचालकांना याचे कोणतेच सोयरसुतक नसल्याचे दिसून आले. यापुढे तरी याठिकाणी वाहतूक पोलीस नेमावा अथवा याठिकाणी वाहन पार्किंग करण्यावर निर्बंध घालावेत, अशी मागणी करण्यात येत आहे. विशेषकरून अधिकाऱ्यांच्या वाहन पार्किंगमुळेच मोठी समस्या होत असल्याचे दिसून येत आहे. तेव्हा यापुढे तरी जिल्हा पंचायतच्या मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर यांनी वाहतुकीला रस्ता मोकळा करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी रण्यात येत आहे.









