अंतिम लढतीत कॅस्पर रुडवर सहज मात : विक्रमी 23 वे ग्रँडस्लॅम जेतेपद : जागतिक टेनिस वर्तुळातून कौतुकाचा वर्षाव
वृत्तसंस्था/ पॅरिस
सर्बियाचा दिग्गज टेनिसटपटू नोव्हॅक जोकोविचने फ्रेंच ओपनचे जेतेपद पटकावत नवा इतिहास रचला आहे. रविवारी झालेल्या अंतिम लढतीत त्याने नॉर्वेच्या कॅस्पर रुडचा 7-6 (7-1), 6-3, 7-5 असा तीन सेटमध्ये पराभव केला. या कामगिरीसह त्याने कारकिर्दीतील विक्रमी 23 वे ग्रँडस्लॅम जिंकण्याची किमया केली. ही कामगिरी करताना त्याने स्पेनच्या राफेल नदालला (22) मागे टाकले. याशिवाय, फ्रेंच ओपनमधील हे त्याचे तिसरे जेतेपद ठरले आहे. दरम्यान, जोकोविचच्या या यशानंतर जागतिक टेनिसमधील दिग्गजांसह अनेक खेळाडूंनी त्याचे अभिनंदन केले आहे.
जोकोविचने टेनिस विश्वात सर्वाधिक ग्रँडस्लॅम चॅम्पियनमध्ये माजी नंबर वन सेरेना विल्यम्सशी बरोबरी साधली आहे. आता या दोघांच्याही नावे सर्वाधिक प्रत्येकी 23 ग्रँडस्लॅमची नोंद झाली आहे. सर्वाधिक 24 ग्रँडस्लॅम ऑस्ट्रेलियाच्या मार्गारेट कोर्टच्या नावे अद्यापही कायम आहे. जोकोविचची नजर मार्गारेटच्या विक्रमाशी बरोबरी साधण्याकडे लागली आहे. तो आता जुलै महिन्यात होणाऱ्या विम्बल्डन स्पर्धेत खेळणार आहे.

अंतिम सामन्यात कॅस्पर रुडने जोकोविचला चांगलीच टक्कर दिली. पहिला सेट 81 मिनिटे चालला, जोकोविचने टायब्रेकरमध्ये 7-6 (7-1) असा विजय मिळवला. सुरुवातीला रुड 3-0 असा आघाडीवर होता परंतु जोकोविचने आपल्या अनुभवाचा पुरेपूर उपयोग करून पहिल्या सेटमध्ये रुडला नमवण्याची किमया साधली. यानंतर दुसऱ्या सेटमध्ये जोकोविचने रुडला पुनरागमनाची संधी न देता हा सेट 6-3 असा जिंकला. तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये रुडने जोकोविचला चांगलेच झुंजवले. हा सेट देखील चांगलाच चुरशीचा झाला. अखेर रुडची कडवी झुंज मोडून काढून जोकोविचने तिसरा सेट 7-5 असा जिंकत ऐतिहासिक कामगिरी साकारली.
जोकोविचने मोडला नदालचा विक्रम
जोकोविचने फ्रेंच ओपनचा किताब जिंकताच सर्वाधिक ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावण्याच्या बाबतीत स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदालचा विक्रम मोडला. जोकोविचच्या नावावर आता सर्वाधिक 23 ग्रँडस्लॅम किताब झाले आहेत. तसेच, नदाल याच्या नावावर आतापर्यंत 22 ग्रँडस्लॅम किताब आहेत. या यादीत तिसूप् स्थानी स्वित्झर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर असून त्याने 20 ग्रँडस्लॅम किताब जिंकले आहेत. मात्र फेडररने टेनिसमधून निवृत्ती स्वीकारली आहे.
नदालकडून जोकोविचचे अभिनंदन
फ्रेंच ओपनमधील ऐतिहासिक विजयानंतर स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदालने जोकोविचचे अभिनंदन केले. ऐतिहासिक व अद्भूत यशाबद्दल खूप खूप शुभेच्छा. 23 या संख्येबद्दल काही वर्षांपूर्वी विचार करणेही कठीण होते. पण तू हे करुन दाखवलेस. असे ट्विट नदालने करत त्याचे कौतुक केले आहे.
जोकोविचची 23 ग्रँडस्लॅम जेतेपदे
ऑस्ट्रेलियन ओपन- 10
फ्रेंच ओपन- 3
विम्बल्डन- 7
यूएस ओपन- 3
sंप्रतिक्रिया
फ्रेंच ओपनमधील यशाबद्दल अभिनंदन! जागतिक टेनिसमध्ये 23 ग्रँडस्लॅम जिंकत आपण नवा इतिहास रचला आहे. आगामी काळातही ही यशाची पंरपरा रहावी यासाठी शुभेच्छा.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू









