चीनला टाकले मागे : देशातील डिजिटल पेमेंटचे प्रमाण 91 टक्के वाढले
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
डिजिटल व्यवहार व्यवसायात भारताने मोठी झेप घेतली आहे. यूपीआयच्या माध्यमातून पैशांच्या व्यवहारमध्ये भारत आता आघाडीवरचा देश ठरला आहे. 2022 मधील व्यवहारांच्या उपलब्ध माहितीनुसार 2021 च्या तुलनेमध्ये भारताने या व्यवहारामध्ये आता आघाडी घेतली आहे.
देशातील डिजिटल पेमेंटच्या व्यवहारामध्ये जवळपास 91 टक्के इतकी दणदणीत वाढ दिसून आली आहे. डिजिटल पेमेंटच्या बाबतीत पाहता भारताने आता चीनलाही मागे टाकले आहे. भारतात 89.5 दशलक्ष इतके डिजिटल व्यवहार झाले आहेत. भारतानंतर ब्राझीलमध्ये 29.2 दशलक्ष डिजिटल व्यवहार झाले आहेत. यापाठोपाठ चीनमध्ये 17.6 दशलक्ष, थायलंडमध्ये 16.5 दशलक्ष आणि दक्षिण कोरियामध्ये 8 दशलक्ष डिजिटल पेमेंट व्यवहार झाले आहेत.
एकेकाळी चीनचा दबदबा
एकेकाळी चीन हा या डिजिटल व्यवहारांमध्ये आघाडीवरचा देश मानला जात होता. 2010 मध्ये चीन हा डिजिटल व्यवहारांमध्ये आघाडीवरचा देश होता. त्यावेळेला डिजिटल व्यवहाराची संख्dया तेथील 1119 दशलक्ष इतकी होती. भारत त्यावेळी 370 दशलक्ष डिजिटल व्यवहारांसह दुसऱ्या स्थानी होता तर तिसऱ्या स्थानी अमेरिका हा देश होता, ज्यांनी 153 दशलक्ष डिजिटल व्यवहारांची नोंद केली होती.
व्यवहारात बेंगळूर अग्रस्थानी
देशामध्ये डिजिटल व्यवहार 2023 मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्याची बाब समोर आली असून या व्यवहारांमध्ये भारतातील बेंगळूर शहर हे अग्रस्थानी राहिले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. बेंगळूर ही डिजिटल व्यवहारांमध्ये पहिल्या क्रमांकावर असून दुसऱ्या क्रमांकावर दिल्ली हे शहर आहे. यानंतर डिजिटल पेमेंटच्या बाबतीत मुंबईचा तिसरा नंबर लागतो. 2022 मध्ये 6500 कोटी रुपयांचे 29 दशलक्ष डिजिटल पेमेंटचे व्यवहार बेंगळूरमध्ये नोंदले गेले आहेत.









