प्रखर हिंदुवादी शरद पोंक्षे यांचे प्रतिपादन : फोंड्यात हिंदु सांस्कृतिक न्यास संस्थेचा उद्घाटन सोहळा
फोंडा : स्वराज्यावर निस्सीम प्रेम करणारे एका पराक्रमी योद्धा श्रीमंत बाजीरावाची गाथा मस्तानीवर प्रेम करणारे बाजीराव अशी ओळख हल्ली देशभरात केली जाते, हे सर्वात मोठे दुर्दैव आहे. ‘युद्ध न करता युद्ध जिंकणे’ अशी युद्धाची रणनितीने वाकबगार, श्रीरामप्रमाणे रामराज्य, श्रीकृष्णाप्रमाणे युद्धनिती व छत्रपती शिवाजी महाराजासारखी स्वराज्याचे साम्राज्य करण्याची जिद्द असलेला अजेय योद्धा श्रीमंत बाजीराव पेशवा अशी ओळख होणे गरजेची आहे, असे मत प्रखर हिंदुवादी तथा प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांनी मांडले. फोंडा येथील राजीव गांधी कला मंदिर येथे हिंदू सांस्कृतिक न्यास या स्वयंसेवी संस्थेच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे तथा श्रीमंत बाजीराव पेशवा एक अजेय योद्धा व्याख्यानाचे मुख्य वक्ता म्हणून बोलत होते. यावेळी त्याच्यासमवेत संस्थेचे अध्यक्ष तथा उद्योजक जयंत मिरिंगकर, उपाध्यक्ष आनंद वाघुर्मेकर, सचिव मनोज गावकर, खजिनदार अजय सावईकर, संजय घाटे, रामकृष्ण गावडे, मशाल आडपईकर उपस्थित होते. शरद पोंक्षे म्हणाले की बाजीराव हे हिंदवी स्वराज्याची धुरा सांभाळणारे ते एक पराक्रमी पेशवा होते. आपल्या अल्प 42 वर्षांच्या कारकिर्दीत एकही युद्ध न हरलेला अजेय योद्धा अशी त्याची ओळख होणे गरजेची आहे. पेशवा ही पदवी आहे. पेशवा म्हणजे छत्रपती नसून छत्रपतीने नेमलेला पंतप्रधान (पेशवा) व बहाल केलेली पदवी आहे. त्यांनी कधीच छत्रपती होण्याची लालसा बाळगली नाही. युद्धानंतर छत्रसाल राजाने बक्षीस म्हणून दिलेले आठ जिल्हे शाहू महाराजाकडे स्वराज्य वाढविण्यासाठी अर्पण केले. पंचमहाभूतांचा योग्य अभ्यास करून युद्धनिती आखत असत. स्वराज्याच्या विस्तारासाठी युद्ध करताना रयतेकडून कधी पैसे न घेता केवळ सावकाराकडून कर्ज घेत लढाया लढल्या व त्यानंतर सर्व धनाची परतफेड सावकारांना केली.
पुणे ते दिल्ली प्रवास घोडस्वारीने अडीच दिवसात गाठणारा योद्धा
विद्युत वेगाने घोडा पळविण्यात ते वाकबगार होते. शत्रुही अचंबित राहील असे त्यांचे शौर्य होते. मुगलांच्या हेरांनी त्याचे वर्णन करताना कायम घोडस्वारीवर असणारा पराव्र्रमी योद्धा अशी पेलेली आहे. ते आपल्या घोड्यावर धनुष्यबाण, तलवार, पाठीमागे ढाल, भाला यासह दौत व टंक बरोबर ठेवत असत. युद्ध मोहीमेवर संदेश पाठविण्यात विलंब होऊ नये म्हणून घोड्यावर बसल्यागत संदेश लिहण्याची कला बाजीरावानी आत्मसात केली होती. पुणे ते दिल्ली हा 10 दिवसांचा घोडस्वारीचा प्रवास केवळ अडीच दिवसात पूर्ण करून मोहीम फत्ते करणारे लढवय्ये होते असे अनेक इतिहासकारांनी लिहलेले आहे. बाजीराव पेशवाची शासनाची पद्धत संपर्क व संवाद यावर भर देणारी होती. पेशवा पदाची जाबबदारी केवळ वयाच्या 20 व्या वर्षी पेलली. पहिल्या पाच वर्षाच्या काळात त्यांनी केवळ संपूर्ण हिंदुस्थानात भ्रमंती करून आढावा घेतला. पंचमहाभुतांचा अभ्यासाअंती युद्धनितीची आखणी हीच एका अजेय योद्धाची जमेची बाजू असल्याचे पोंक्षे यांनी सांगितले. सातव्या शतकापासून ते सतराव्या शतकापर्यंत राज्यभिषेक कधी कुणी पाहिलाच नव्हता. अंत्यत गलिच्छ जातीयवादी राजकारणाचा बळी ठरलेला अद्वितीय योद्धा आहे. ब्राह्मणाशिवाय इतर कुठल्याही अन्य जातीत जन्मात झाला असता तर आज चौकाचौकात पुतळे दिसले असते अशी खंतही व्यक्त केली. इतिहासातून गायब होत चाललेल्या थोर पराक्रमी राजे, पुढारी, महापुरूषांचा इतिहास आजच्या युवा पिढीला समजावून सांगण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तत्पुर्वी हिंदु सांस्कृतिक न्यासाच्या लोगोचे अनावरण शरद पोंक्षे यांच्याहस्ते करून संस्थेची स्थापना करण्यात आली. स्वागत व प्रास्ताविक अध्यक्ष जयंत मिरिंगकर यांनी केली. दीपा मिरिंगकर यांनी पोंक्षे यांची ओळख करून दिली. आनंद वाघुर्मेकर यांनी आभार मानले.









