चंद्रकांत कवळेकर यांची टीका : फक्त लोकांची दिशाभूल आणि इतरांच्या कामांचे श्रेय घेण्याचे काम
केपे : स्थानिक आमदार एल्टन डिकॉस्ता हे दुटप्पी भूमिका घेऊन गेल्या पंधरा महिन्यांपासून फक्त लोकांची दिशाभूल करत आहेत. जेथे संधी मिळते तेथे ते सरकारविऊद्ध बोलून लोकांमधे चीड निर्माण करतात आणि मुख्यमंत्री, मंत्र्यांसमोर गुणगान गातात. अशा दुटप्पी भूमिकेमुळे सरकारच्या प्रतिमेचीही हानी होते, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री व प्रदेश भाजप उपाध्यक्ष चंद्रकांत कवळेकर यांनी केपे भाजप मंड़ळाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केली. यावेळी केपेच्या नगराध्यक्षा सुचिता शिरवईकर, जि. पं. सदस्य संजना वेळीप, नगरसेवक दयेश नाईक, चेतन ह़ळदणकर, गणपत मोडक, मंडळ अध्यक्ष संजय वेळीप, महिला मोर्चा अध्यक्षा शीतल नाईक, युवा मोर्चा अध्यक्ष विराज देसाई, मेदिनी नाईक व इतर हजर होते. मोरपिर्ला येथील हायस्कूलसंदर्भात यापूर्वी दोन वेळा निविदा काढण्यात आल्या होत्या. मात्र त्या कोणीच स्वीकारल्या नसल्याने काम होऊ शकले नाही. आता मुख्यमंत्र्यांनी तिसऱ्यांदा निविदा जारी केली आहे. यापूर्वीही शिक्षणखाते मुख्यमंत्र्यांकडे होते व आताही आहे. लोकांची दिशाभूल करून मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रकार स्थानिक आमदारांकडून होत आहे, असा दावा कवळेकर यांनी केला.
केपेतील सात ते आठ रस्त्यांच्या कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न आमदारांनी केलेला आहे. बोमडामळ-खणगणी, कट्टा आमोणा, देऊळमळ ते बोमडामळ, केपे बाजार, बाळ्ळी-फातर्पा रस्ता, बाळ्ळी पंचायत क्षेत्रातील अंतर्गत रस्ते, खोल येथील संरक्षक भिंत व इतर कामांचे सोपस्कार आणि मंजुरी आपल्या कार्यकाळात घेण्यात आली. या कामांचे श्रेय घेण्याचे काम त्यांच्याकडून केले जात आहे, असा दावा कवळेकर यांनी केला. दुसऱ्यांनी केलेल्या कामांचे श्रेय घेण्यापेक्षा त्यांनी स्वत: राहिलेल्या कार्यकाळात कामे करावीत. राजकीय मतभेद कितीही असले, तरी विकासाच्या बाबतीत आपला सदैव पाठिंबा असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. बेतूल येथील शिवराज्याभिषेकदिन कार्यक्रमात मुख्यमंत्री हे आमचे वडील, मंत्री थोरले बंधू असे सांगताना पुढे आजोबा-पणजोबांच्या पोटात का दुखते असे म्हणून आमदार डिकॉस्ता यांनी पक्षाच्या अध्यक्षांना टोमणा मारण्याचा जो प्रयत्न केला तसे प्रकार सहन करून घेतले जाणार नाहीत, असा इशारा कवळेकर यांना दिला. आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी बेतूल येथे पक्षाच्या प्रदेश अध्यक्षांविषयी जे वक्तव्य केले ते योग्य नसून त्याचा आपण मंडळ अध्यक्ष या नात्याने निषेध करतो, असे संजय व़ेळीप यांनी सागितले .









