अव्वाच्या सव्वा वीजबिल लघुउद्योगांच्या मुळावर
बेळगाव : भरमसाट आलेल्या वीजबिलामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. तब्बल तीनपट अधिक वीजबिल आल्याने वीजग्राहकांचे डोळे पांढरे झाले आहेत. ‘आमदनी अठन्नी और वीजबिल रुपय्या’ अशी अवस्था झाल्याने सर्वसामान्य वीजग्राहकांच्या सहनशीलतेचा कडेलोट झाला आहे. केवळ घरगुती ग्राहकच नव्हे तर लघुउद्योजक व विणकरांनाही या दरवाढीचा दणका बसला असून त्यांचा संताप अनावर झाला आहे. यामुळे ‘आपण हे बिलच भरणार नाही’ या निर्णयापर्यंत ते पोहोचले आहेत. बेळगाव तालुक्यामध्ये अनेक यंत्रमागधारक आहेत. वडगाव, खासबाग, धामणे रोड, सुळेभावी आदी भागात विणकर व्यवसाय चालतो. अगोदरच हा व्यवसाय तोट्यात असल्याने अनेक विणकर कामगार कर्जबाजारी झाले आहेत. काहींनी तर आत्महत्याही केल्या आहेत. परिणामी सरकारने यंत्रमागांना वीजदरात सवलत दिली होती. मात्र, नवीन सरकार सत्तेवर येताच अव्वाच्या सव्वा वीजबिल आकारण्यात येत असल्याने गरीब जनता संतापली आहे. या वाढीव वीजबिलांच्या धर्तीवर सुळेभावी परिसरातील विणकरांची व्यापक बैठक पार पडली. देण्यात आलेले वीजबिल भरणे केवळ अशक्य असल्याने ते न भरण्याचा निर्णय विणकरांनी घेतला आहे. अशीच काहीशी भूमिका उद्यमबागमधील लघुउद्योजकांनीही घेतली आहे. वीजबिलवाढीचा दणका लघुउद्योगांना मोठ्या प्रमाणात बसला असून त्यांच्यावर उद्योग बंद करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी हेस्कॉमला जाब विचारण्याचाही निर्णय घेतला आहे.
युवा समितीचे आज निवेदन
हेस्कॉमने वीजबिलात भरमसाट वाढ केली असून सर्वसामान्य जनता यामध्ये भरडली जात आहे. सरकारने सारासार विचार करत ही दरवाढ त्वरित मागे घ्यावी, या मागणीसाठी म. ए. युवा समितीच्यावतीने सोमवार दि. 12 रोजी सकाळी 11 वाजता नेहऊनगर येथील हेस्कॉम अधिकाऱ्यांना निवेदन दिले जाणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन युवा समितीने केले आहे.









