कोरोना काळापासून बंदच, विठ्ठलभक्तांमध्ये नाराजी, आषाढीपूर्वी एक्स्प्रेसची मागणी
बेळगाव : बेळगाव, हुबळी, मिरज या परिसरातील दरवर्षी शेकडो वारकरी पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी जातात. परंतु, मागील तीन वर्षांपासून बंद असलेली बेळगाव-पंढरपूर एक्स्प्रेस अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. रेल्वे नसल्यामुळे बससेवेवर भार वाढत असून किमान यावर्षी तरी आषाढी एकादशीपूर्वी रेल्वे सुरू करण्याची मागणी वारकऱ्यांमधून होत आहे. बेळगाव-पंढरपूर मार्गावर यापूर्वी दिवसभरात तीन एक्स्प्रेस धावत होत्या. सकाळी 6 वा., दुपारी 2.30 वा. व सायंकाळी 4 वाजता रेल्वे धावत असल्याने विठ्ठलभक्तांना अतिशय माफक दरात पंढरपूर गाठता येत होते. दररोज ही रेल्वेसेवा असल्यामुळे वर्षाचे बारा महिने पंढरपूरला जाणे सोयीचे होते. त्यामुळे दररोज शेकडो प्रवासी या मार्गावर प्रवास करत होते. कोरोनाचा प्रभाव वाढल्यानंतर मार्च 2020 मध्ये या सर्वच एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या. तेव्हापासून आजपर्यंत बेळगाव-पंढरपूर मार्गावर रेल्वे उपलब्ध नाही. बेळगावहून पंढरपूरला जाण्यासाठी एकतर मिरजेपर्यंत जाऊन तेथून दुसरी एक्स्प्रेस पकडण्याची वेळ भाविकांवर येत आहे. यशवंतपूर-पंढरपूर एक्स्प्रेस आठवड्यातून एक दिवस असली तरी त्यामध्ये भरमसाट गर्दी असल्याने दिवसातून किमान एक तरी एक्स्प्रेस बेळगाव-पंढरपूर मार्गावर धावावी, अशी मागणी होत आहे. सध्या बेळगाव-मिरज रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण अंतिम टप्प्यात असून एक्स्प्रेस सुरू करण्यास कोणतीही अडचण नसल्याने नैत्य रेल्वेने विचार करण्याची गरज आहे. 29 जून रोजी आषाढी एकादशी आहे. देहू येथून संत तुकाराम महाराजांची पालखी मार्गस्थ झाली असल्याने विठ्ठलभक्त आता पंढरपूरच्या दिशेने रवाना होणार आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यात किमान वारीच्या दरम्यान तरी रेल्वे सुरू करावी, अशी मागणी विठ्ठलभक्तांमधून होत आहे.









