राष्ट्रीय महामार्गाला घालण्यात आलेले पाईप पूर्णपणे बुजले : माती काढण्याची नागरिकांची मागणी
बेळगाव : शहरातील पाणी रांगी नाल्यातून बळ्ळारी नाल्याला जाऊन मिळते. मात्र रांगी नाल्यावर राष्ट्रीय महामार्गाला घालण्यात आलेले पाईप पूर्ण बुजले आहेत. याचबरोबर या नाल्यामध्ये अतिक्रमण करून अनेकांनी प्लॉट पाडविले आहेत. त्यामुळे शहराला या वर्षीही पुराचा मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होत असून तातडीने राष्ट्रीय महामार्गावरील पाईपमधील माती काढावी, अशी मागणी नारायण सावंत यांनी केली आहे. शहरातील पाणी या नाल्यातून जाते. मात्र या नाल्यातून पाण्याचा निचरा झाला नाही तर शहराला पूर येण्याची भीती व्यक्त होत आहे. मागील दोन वर्षांपूर्वीही पाण्याचा निचरा झाला नाही. त्यामुळेच समर्थनगर, गोवावेस नाला, कपिलेश्वर कॉलनी, बसवेश्वर सर्कल, रेल्वेलाईन, काँग्रेस रोड, शिवाजी उद्यान, शास्त्राrनगर, मराठा कॉलनी या परिसराला पुराचा फटका बसला होता. अनेक घरांमध्ये पाणी शिरुन मोठे नुकसान झाले होते. यावर्षीही नुकसान होण्याची शक्यता असून तातडीने त्या पाईपमधील माती काढावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
रांगीचा नाला बळ्ळारी नाल्याला जोडला गेला आहे. मात्र या नाल्यावर अनेक बिल्डरांनी व प्लॉटधारकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे नाल्याचे पाणी पुढे जाणे अवघड झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रीय महामार्गावर घालण्यात आलेले 16 पाईप पूर्णपणे मातीने बुजले आहेत. मागील वर्षी काही प्रमाणात यातील माती काढण्यात आली होती. मात्र आता पुन्हा या नाल्यामध्ये माती टाकल्याने ती माती या पाईपमध्ये अडकली आहे. पाईप खुले न केल्यास पावसाळ्यात गंभीर परिस्थिती निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या पाच वर्षांपासून महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडे आम्ही पाठपुरावा करत आहे. मात्र म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. वास्तविक राष्ट्रीय महामार्गावर सिमेंटचे मोठे बॉक्स तयार करणे गरजेचे आहे. पाईपमधील माती काढणे अशक्य असून बॉक्स तयार राहिले तर त्यामधील माती काढणे सोपे जाणार आहे. तेव्हा महापालिकेने व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने संयुक्तपणे ही समस्या सोडविणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.









