शेतकऱ्यांसह देशाचेही उत्पन्न वाढण्यास मदत : शासनाने विचार करण्याची गरज
वार्ताहर /उचगाव
रोजगार हमी योजनेअंतर्गत हजारो महिला आज कामासाठी घराबाहेर पडतानाचे चित्र दिसत आहेत. मात्र तेच शेतावरती काम करण्यासाठी किती महिला आज घराबाहेर जात आहेत, हा संशोधनाचा प्रश्न आहे. शासनानेच रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकडून दीडशे रुपये व शासनाकडून दीडशे रुपये असे रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या याच महिलांना तीनशे रुपये देऊन जर शेतीची कामे केली तर खऱ्या अर्थाने शेतात भरघोस पिके येतील. शेतकरी सधन होईल आणि देशाचेही उत्पादन अधिक वाढेल. देश खऱ्याअर्थाने सुजलाम सुफलाम होईल. शेतातील कामे करण्यासाठी आज कामगारच मिळत नसल्याने शेती व्यवसाय मोडकळीस आल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यासाठी शासनाने याचा जरूर विचार करावा, अशी अनेक शेतकऱ्यांची मागणी आज होताना दिसत आहे. आपला देश हा शेतीप्रधान देश आहे. या देशांमध्ये विविध प्रकारची पिके, अन्नधान्य पीकत असतात. मात्र अलीकडच्या काळात पाहिले तर शेतात काम करणे नकोसे झाले आहे. अन्नधान्य जर पाहिजे असेल तर शेतात काम केल्याशिवाय आपणाला अन्नधान्य कसे मिळणार, मात्र आज प्रत्येक शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये पाहिले तर सर्वजण सुशिक्षित असल्याने शेतात काम करणे, राबणे प्रत्येकाला नकोसे वाटते. यामुळे शेतातील उत्पादनामध्ये दिवसेंदिवस घट होत असल्याचे चित्र पाहावयास मिळते.
पूर्वीच्या काळी घरातील सर्व कुटुंब शेतावरती जाऊन काम करत असते.राबत असते आणि त्यामुळे भरघोस पिकं काढली जात होती. मात्र आजचा काळ यंत्र युगाचा जरी असला तरी काम करण्यासाठी कामगार वर्ग हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. पण कामगार वर्गच मिळत नसल्याने शेतातील पिके कशी काढावी, अन्नधान्य कसे पिकवावे या विवंचनेत शेतकरी अडकल्याचे दिसून येत आहे. यासाठी शासनाने रोजगार हमी योजना देशांतर्गत सुरू केली. या योजनेसाठी प्रत्येक घरातून ज्या महिला आहेत त्या कामावरती यायला लागल्या. एका अर्थाने हे चित्र देशाच्या हिताचेच ठरणार आहे. महिला शेतामध्ये याप्रमाणेच काम करू लागल्या तर प्रत्येक शेतकरी सधन होईल. यासाठी शासनाने अर्धी व शेतकऱ्यांनी अर्धी रक्कम देऊन याच महिलांचा उपयोग रोजगार हमी योजनेसाठी केला गेला तर आपल्या देशातील उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत होईल. यासाठी शासनाने याचा जरूर विचार करावा, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
शेती व्यवसायाला पुन्हा एकदा उर्जितावस्था येईल
मुळातच या सर्व महिला शेतकरी कुटुंबातीलच असल्याने आज रोजगार हमी योजनेअंतर्गत जी कामे शासन त्यांना लावत आहे, ती कामे या महिला करताना दिसत आहेत. शेतातील उत्पादन घेण्यासाठी जर शेतकऱ्यांनी दिलेली कामे या महिला जर करायला लागल्या तर शेती व्यवसायाला पुन्हा एकदा उर्जितावस्था प्राप्त होईल. भरघोस पिके येतील आणि देश सधन होण्यास मदत होईल. सुजलाम सुफलाम होण्यास मदत होईल.









