वृत्तसंस्था/ इस्तांबूल
युरोपियन फुटबॉलच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी मँचेस्टर सिटीने केलेल्या प्रवासावर खर्च करण्यात आलेले अब्जावधी डॉलर्स सत्कारणी लागले असून इस्तंबूलच्या अतातुर्क ऑलिम्पियात स्टेडियममध्ये ही मोहीम पूर्ण झाली. अबू धाबीचा पाठिंबा लाभलेल्या या क्लबने या ठिकाणी प्रथमच चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद जिंकले आणि स्पर्धेतील वर्चस्वाच्या नवीन युगाची सुऊवात होण्याची चिन्हे दाखविली.
हे जेतेपद आमच्या नशिबात लिहिले होते, ते आमचे आहे, असे पेप गार्डिओलाने इंटर मिलानविऊद्ध 1-0 फरकाने मिळविलेल्या विजयानंतर सांगितले, या विजयाने व्यवस्थापक, खेळाडू आणि निळा शर्ट घालून आलेल्या असंख्य चाहत्यांना अश्रू अनावर झाले. रॉड्रीच्या एकमेव गोलच्या जोरावर त्यांनी हा विजय मिळविला. शेख मन्सूर बिन झायेद अल नाह्यान यांनी मँचेस्टर सिटीचे एका रात्रीत जगातील सर्वांत श्रीमंत संघात रुपांतर घडविल्यापासून मागील 15 वर्षे हा संघ या जेतेपदाच्या शोधात होता. मिडफिल्डर डी ब्रुयनला 36 व्या मिनिटाला दुखापतीमुळे बदलावे लागूनही मँचेस्टर सिटीने हे यश मिळविले.
गार्डिओलाच्या संघाने या हंगामात प्रीमियर लीग विजेतेपद आणि एफए कप जिंकल्यानंतर आता चॅम्पियन्स लीगही जिंकून एक हँटट्रिक पूर्ण केली आहे. स्पॅनिश मिडफिल्डर रॉड्रीने 68 व्या मिनिटाला केलेल्या गोलने सामन्याचे स्वरूप बदलून टाकले. इंटर मिलानने शेवटच्या क्षणी जवळजवळ बरोबरी साधण्यात यश मिळविले होते. पण बदली खेळाडू रोमेलू लुकाकूने मारलेला हेडर एडर्सनने रोखला.









