ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून व्हायचे धर्मांतर : उत्तरप्रदेश पोलिसांची कारवाई
वृत्तसंस्था/ मुंबई
ऑनलाईन गेमिंग अॅप्लिकेशनद्वारे मुलांचे धर्मांतर करविणाऱ्या रॅकेटचा सूत्रधार शाहनवाज खान उर्फ बद्दोला महाराष्ट्रातून अटक करण्यात आली आहे. अलीबाग शहरातून त्याला अटक करण्यात आली आहे. बद्दो हा मूळचा ठाण्यातील मुंब्रा येथील रहिवासी आहे. उत्तरप्रदेश पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होता.
उत्तरप्रदेशच्या गाजियाबादमध्ये ऑनलाइन गेमिंग अॅप्लिकेशनद्वारे धर्मांतर घडविण्यात आल्याचे उघडकीस आले होते. यात शाहनवाज खान आणि गाजियाबाद येथील एका मौलवीच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. मौलवी अब्दुल रहमान आणि बद्दोने आपल्या मुलाचे धर्मांतर करविल्याची तक्रार गाजियाबाद येथील एका इसमाने केली होती.
आमचा मुलगा एका ऑनलाइन गेमिंग अॅपद्वारे बद्दोच्या संपर्कात आला होता, यानंतर आमच्या मुलाने बद्दोच्या सांगण्यावरून धर्मांतर केले होते असे संबंधित इसमाने स्वत:च्या तक्रारीत नमूद केले होते.
याप्रकरणी मुंब्रा पोलीस आणि गाजियाबाद पोलिसांनी मिळून शाहनवाजला अलिबाग येथून अटक केली. शाहनवाजवर मुलाचे बळजबरीने धर्मांतर करविल्याचा आरोप आहे. मागील अनेक दिवसांपासून अलीबा आणि मुंब्रा पोलीस एका संयुक्त मोहिमेच्या अंर्तत शाहनवाजचा शोध घेत होते. परंतु वारंवार स्वत:चा ठावठिकाणा बदलत होता. याचदरम्यान त्याच्या नातेवाईकांची चौकशी करण्यात आली असता तो मुंबईतील वरळी येथे लपून बसल्याची माहिती मिळाली होती. परंतु तत्पूर्वी बद्दो हा अलिबाग येथील लॉजमध्ये पोहोचला होता. तेथेच त्याला जेरबंद करण्यात आले आहे.
फोर्टनाइट तसेच अन्य एका गेमिंग अॅपद्वारे बद्दोने अनेक जणांचे धर्मांतर करविल्याचे मानले जात आहे. या गेमिंग अॅपवर तो धर्मांतराचे कथित फायदे मुलांना सांगत होता. मुलांची दिशाभूल करून त्यांचे धर्मांतर करविण्याचा हा प्रकार दोन टप्प्यांमध्ये पार पडत होता. पहिल्या टप्प्यात हँडलर हिंदू नावांनी आयडी तयार करत होते. मग हिंदू धर्मीय मुलांना ‘फोर्टनाइट’ गेम खेळण्यासाठी प्रवृत्त करत होते. संबंधित मुलगा गेममध्ये पराभूत झाल्यावर तो विशिष्ट धर्मग्रंथाचे वाचन केल्यावर जिंकेल असे सांगण्यात येत होते. यानंतर या धर्मग्रंथाचे वाचन करणाऱ्या मुलाला कटाच्या अंतर्गत जिंकवून दिले जात होते. मग या मुलांचा अन्य धर्माकडील ओढा वाढत होता.
यानंतर दुसरा टप्पा सुरू केला होता. यात मुलांसोबत ‘डिसकॉर्ड’ अॅपद्वारे चॅटिंग केले होते. मुलांचा विश्वास संपादित करत त्यांना संबंधित धर्माची माहिती दिली जात होती. मग या मुलांना झाकिर नाईक आणि तारिक जमील यांचे व्हिडिओ दाखविले जात होते. त्यांना धर्मांतरासाठी प्रवृत्त केले जात होते. मुलांचा धर्मांतराच्या दिशेने कल दिसून आल्यावर त्यांच्याकडून एक प्रतिज्ञापत्र तयार करवून घेतले जात होते. यात स्वमर्जीने धर्मांतर करत असल्याचे या प्रतिज्ञापत्रात नमूद असायचे.









