रत्नागिरी प्रतिनिधी
रत्नागिरीतील व्यापाऱ्यांकडून लाखो रूपयांच्या खंडणीची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बदनामीच्या भितीने या व्यापाऱ्याने आतापर्यंत 1 लाखहून अधिक रूपये देवू केले. मात्र खंडणीची मागणी वाढत गेल्याने अखेर या व्यापाऱ्यांकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी दोघां संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल केला असल्याची माहिती सांगण्यात आली आहे.
रत्नागिरीत मागील काही दिवसांपासून व्यापाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार सुरू असल्याची कुजबुज शहर परिसरात ऐकायला मिळत होती. त्यातूनच पैशाची देखील मागणीचे प्रकार समोर आले आहेत. असाच एक प्रकार या व्यापाऱ्यांच्या बाबतीत घडला असल्याचे बोलले जात आहे. मार्च 2020 ते 10 जून 2023 या काळात या व्यापाऱ्यांची बदनामी करण्याची धमकी दोघा संशयित आरोपिंकडून देण्यात आली होती. या व्यापाऱ्याने प्रथम या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले होते. मात्र धमकीचे प्रकार वाढत गेल्याने अखेर या व्यापाऱ्यांकडून पैसे देण्याची मागणी मान्य करण्यात आली.
त्यानुसार मार्च 2020 ते 10 जून 2023 या दरम्यानच्या काळात या व्यापाऱ्याने सुमारे 1 लाख हून अधिक रक्कम या दोघा संशयितांना देवू केली. असे असले तरी सातत्याने दोघा संशयितांकडून पैशाची मागणी या व्यापाऱ्यांकडे करण्यात येत होती. अखेरीस खंडणीसाठी धमकीचे सत्र सुरूच राहिल्याने व्यापाऱ्याने पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार व्यापाऱ्याने पोलिसांत तक्रार दाखल केली त्यानुसार पोलिसांनी दोन्ही संशयितांविरूद्ध भादंवि कलम 384,506 सह 34 नुसार गुन्हा दाखल केला असल्याची माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.
मागील काही वर्षांपासून शांत असलेल्या रत्नागिरीत गुन्हेगारी डोके वर काढत असल्याची चर्चा शहर परिसरात ऐकायला मिळत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता खंडणीसारखे गुन्हे घडत असल्याचे दिसून येते. मागील वर्षी रत्नागिरी शहर परिसरात झालेल्या खूनांच्या घटनेने रत्नागिरी जिल्हा हादरून गेला होता. तसेच गांजा, अंमली पदार्थ यांसारख्या घटनांची नोंद शहर परिसरात वारंवार होत आहे. लाखो रूपयांची खंडणीची मागणी झाल्याने आता व्यापारी वर्गात देखील काही प्रमाणात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. संशयित आरोपींना लवकरच पोलिसांनी बेड्या घालाव्या, अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिकांमधून होताना दिसत आहे.