भारतीय जनता पक्ष हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना घाबरत असून ही चांगली गोष्ट असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राउत यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. २०१९ च्या निवडणुकीत जर एनडीए सरकारला बहुमत मिळालं तर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असे उद्धव ठाकरे यांनी मान्य केलं असल्याचा खुलासाही अमित शाह यांनी केल्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राउत यांनी अमित शहांना प्रत्युत्तर दिले आहे.
माध्यमांशी बोलताना अमित शहा यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना संजय राउत यांनी भाजपला अजूनही ठाकरेंचा धसका असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, “भाजप उद्धव ठाकरेंना घाबरते हे चांगलंच आहे. त्यांच्यामुळेच पक्षात फूट पडली. शिवसेनेच्या गद्दारांना नाव आणि चिन्ह त्यांनीच दिलं; तरीही उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची भीती त्यांना आहे. अमित शहा 20 मिनिटे बोलले त्यातील सात मिनिटे उद्धवजींवर घालवली. त्यांचे भाषण मजेदार झाले असून मला याचे आश्चर्य वाटते की नांदेड येथील त्यांची सभा भाजपच्या महासंपर्क अभियानाचा भाग होता की ठाकरेंवर टीका करण्याचा कार्यक्रम.” असे ते म्हणाले.
काल नांदेड येथे जनसमुदायाला संबोधित करताना केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी ठाकरे गटावर हल्ला केला. २०१९ मध्ये ‘एनडीए’ला बहुमत मिळालं तर देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, हे उद्धव ठाकरेंना मान्य होतं. पण जेव्हा निकाल लागला आणि एनडीए जिंकली, तेव्हा उद्धव ठाकरेंनी आपलं वचन तोडून सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसले असल्याचा आरोप केला होता.