ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुणे-सातारा महामार्गावर कापूरहोळजवळ चार वाहनांचा विचित्र अपघात झाला. यात दोन कंटेनर आणि दोन बसचा समावेश असून, खासगी बसमधील चार प्रवाशांचा या अपघात मृत्यू झाला. तर 23 जण जखमी आहेत. त्यामधील 4 जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त वाहने पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने जात असताना हा भीषण अपघात झाला. पुण्याच्या दिशेने येत असलेल्या कंटेनरला खासगी बसने मागून जोरदार धडक दिली. या धडकेत बस उलटली. बस उलटल्यामुळे बसमधील 4 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. याचवेळी मागे असलेल्या शिवशाही बसचीही कंटेनरला धडक बसली. एक कार देखील कंटेनरला मागून धडकली. मात्र, कारमधील प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.
अपघातानंतर पोलीस आणि स्थानिक नागरिकांकडून मदतकार्य सुरु करण्यात आले आहे. अपघातात जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमधील चौघांची प्रकृती गंभीर असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.








