रत्नागिरी प्रतिनिधी
रत्नागिरी कोकण रेल्वेगाड्यांचे बदललेल्या मान्सूनचे वेळापत्रक प्रवाशांच्या ध्यानात न आल्याने शनिवारी रत्नागिरी रेल्वेस्थानकावर काहीसा गोंधळ उडाला. शताब्दी एक्स्प्रेस गाडी बदललेल्या वेळापत्रकानुसार रेल्वेस्थानकांतून मार्गस्थ झाल्याने त्या गाडीच्या काढलेल्या तिकीटामुळे प्रवासी ताटकळले आणि त्यांनी संताप व्यक्त केला.
कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या सर्व रेल्वेगाड्याना मान्सून वेळापत्रक लागू करण्यात आले आहे. शुक्रवार १० जूनपासून लागू झालेल्या वेळापत्रकानुसार आता सर्व रेल्वे गाड्या नियोजित वेळेनुसार धावू लागल्या आहेत. त्यामुळे पूर्वीच्या वेळेअगोदर या रेल्वेगाड्या स्थानकातून मार्गस्थ होत आहेत. मात्र शनिवारी रेल्वेस्थानकावर शताब्दी एक्स्प्रेससाठी दाखल झालेल्या काही प्रवाशांना याची कल्पना नव्हती. पूर्वीच्या असलेल्या या गाडीच्या वेळेनुसार प्रवासी स्थानकावर दाखल झाले होते. त्यावेळी शताब्दी एक्स्प्रेस मुंबईकडे मार्गस्थ झालेली माहिती मिळताच त्या प्रवाशांचा गोंधळ उडाला. तिकीटे काढूनही ही गाडी चुकल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. रेल्वेस्थानकाच्या कर्मचाऱ्यांशी या प्रवाशांनी जाब विचारला. पण मान्सूनचे बदललेले रेल्वे वेळापत्रक त्या प्रवाशांच्या ध्यानात आले नसल्याची बाब समोर आली. त्यामुळे हा गोंधळ उडाला होता. त्यानंतर शताब्दी चुकलेल्या त्या प्रवाशांना इतर रेल्वेगाड्यांचा आधार घेत पुढील प्रवासाचा पर्याय स्वीकारण्याची वेळ आली.