रहिवाशांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
मंगाईनगर, वडगाव येथे मोठी वसाहत आहे. या वसाहतीत जाण्यासाठी वडगाव येथील श्री मंगाई मंदिरासमोर रस्ता आहे. मात्र, या रस्त्यावर मंगाई कमिटीकडून भिंतीची उभारणी करण्यात येत आहे. त्यामुळे मंगाईनगरला ये-जा करण्यासाठी रस्ताच राहणार नाही. तेव्हा अनधिकृत बांधकाम तत्काळ थांबावावे, अशी मागणी मंगाईनगर, वडगाव येथील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली.
गेल्या 20 हून अधिक वर्षांपासून हा रस्ता आहे. सीडीपीमध्येही रस्ता असल्याचा उल्लेख आहे. नकाशाही आहे. असे असताना या रस्त्यावर अतिक्रमण करून भिंत बांधण्यात येत आहे, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. मंगाईनगरला ये-जा करण्यासाठी या रस्त्याव्यतिरिक्त दुसरा पर्यायच नाही. त्यामुळे हा रस्ता सीडीपीप्रमाणे सोडावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
मंगाईनगरवासियांना रस्त्याची नितांत गरज आहे. मात्र, रस्ता झाला नाही तर कसे जायचे? असा प्रश्न त्यांना पडला आहे. तेव्हा त्याचा सारासार विचार करून हा रस्ता साऱ्यांसाठी खुला करावा, अशी विनंती निवेदनात केली आहे. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी बंडू केरवाडकर, श्रीधर बिर्जे, प्रशांत हनगोजी, आनंद गोंधळी, किरण पाटील यांच्यासह महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.