उद्योग खात्रीतील कामांवर लाभ, वाटणीतून वादावादी अन् मारामारी, खात्रीतील उद्योग पडला बाहेर
बेळगाव : गुप्त धन असो किंवा चोरीचे धन असो, जेव्हा वाटणी असते तेव्हा भांडण-तंटे हे होतातच. सर्वांनी वाटून खाल्ले तर ते झाकून जाते. मात्र एकानेच अधिक धन किंवा सोने घेतल्यास न मिळालेल्या व्यक्ती हे प्रकरणच उघडे पाडतात. असाच प्रकार उद्योग खात्री योजनेतील महिलांच्या गटामध्ये घडला असून या प्रकारामुळे मारामारी होऊन प्रकरण चक्क पोलीस स्थानकात गेले आहे. यामुळे तुपही गेले आणि तेलही जाण्याची वेळ आली आहे. या प्रकाराची आता आंबेवाडी परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. उद्योग खात्रीमध्ये आम्हाला काम द्यावे म्हणून धावाधाव महिला करत असतात. काम मिळते, कामाबरोबर सोनेही मिळाले. मात्र या सोन्याच्या वाटणीवरून महिलांमध्ये चांगलीच झुंपली. चोरावर मोर होण्याचा प्रयत्न एका राजकीय व्यक्तीनेही केला आहे. त्यामुळे महिलांमध्ये जोरदार मारामारी झाली. आता न्याय मागण्यासाठी हे प्रकरण पोलीस स्थानकात गेले आहे. सोन्याचा मोह भल्याभल्यांना अडचणीत आणतो. असे प्रकार आपण वारंवार पाहिले आहेतच. विशेषकरून सोन्याचा मोह हा महिलांना अधिक असतो. आणि त्यात वावगेही काही नाही. महिला घर चालवितात, काटकसर करतात, त्यामधून शिल्लक राहिलेल्या रकमेतून त्या सोने खरेदी करतात. मात्र हे पैसे कष्टाचे असतात. परंतु एखाद्यावेळी सोने सापडले त्यावेळी इतर महिला असतील तर त्यांनाही वाटणी दिलीच पाहिजे. अन्यथा इतरांना ही माहिती समजते, हे निश्चितच आहे.
बेळगाव तालुक्यातील आंबेवाडी ग्राम पंचायतीच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. मागील 15 दिवसांपूर्वी उद्योग खात्रीतून काम करताना एका महिलेला सुमारे 4 ते साडेचार तोळे सोने सापडले. सोने सापडताच त्या गटामध्ये असलेल्या महिलांनी आपण सर्वजणींनी वाटून घेण्याची चर्चा केली. ज्या महिलेला सोने सापडले त्या महिलेला चेन देऊन त्यावर 5500 रुपये देण्याचा ठराव संबंधित गटातील महिलांनी घेतला. हा सारा व्यवहार 15 दिवसांपूर्वीच झाला होता. या गटामध्ये याबाबत गुप्तता ठेवण्यात आली होती. दरम्यान 15 दिवस झाले तरी संबंधित महिलेला 5500 रुपये दिले नाहीत. त्यामुळे सदर महिलेने गटाकडे पैसे मागण्यास सुरुवात केली. मात्र गटातील महिलांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. दरम्यान सोने सापडलेल्या महिलेने मला या महिला ठरलेली रक्कम देत नाहीत म्हणून तिने सापडलेल्या सोन्याची माहिती दुसऱ्या गटाला दिली. त्या गटातील महिलांनी तु पोलिसांत तक्रार कर, असा सल्ला दिला. त्यामुळे महिलेच्या गटातील काहींनी सदर महिलेला याचा जाब विचारला. त्यामुळे त्यांच्यात जोरदार वादावादी सुरू झाली. याचबरोबर सोन्याच्या सापडलेल्या हाराची विक्री गटातील महिलांनी 1 लाख 20 हजाराला केली होती. त्याच गटातील एका महिलेने 3 तोळ्याचा हार घेऊन पैसेही दिले होते. मात्र सापडलेल्या महिलेला हार न दिल्याने तिने इतरत्र याची वाच्यता केली आणि त्यानंतर हा प्रकार मारामारीपर्यंत पोहोचला.
तुपही गेले आणि तेलही गेले
ही घटना ग्राम पंचायत अध्यक्षांपर्यंत पोहोचली. त्यानंतर त्यांनी सोने सापडलेल्या महिलेकडील ती चेन स्वत: घेतली आहे. ते आता पुढे कोणती भूमिका घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान महिला गटामध्ये वाद झाल्यानंतर सापडलेल्या सोन्याची माहिती त्या महिलेने आपल्या भावाला कळविली. त्यानंतर भाऊ आणि त्यांचे समर्थक येवून त्या महिलांचा शोध घेत होते. मात्र त्या महिला आढळल्या नाहीत. एकूणच साडेचार तोळे सोने आणि घडलेला प्रकार पाहता सोनेच नको म्हणण्याची वेळ आता साऱ्यांवर येवून ठेपली आहे. हे प्रकरण पोलीस स्थानकात गेल्यानंतर आता पुढे तुपही गेले आणि तेलही गेले, असाच प्रकार होणार अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. उद्योग खात्री योजनेंतर्गत नदी किंवा नाल्यांमध्ये काम करत असताना चांदीच्या मूर्ती, तांब्याची भांडी व इतर किमती वस्तू आढळल्या आहेत. त्यावेळी महिलांनी त्या वाटून घेतल्या आहेत. मात्र आता सर्वात किमती सोने आढळल्यानंतर मात्र वाटणीवरून चांगलाच वाद रंगला आहे.
…हा देखील एक गुन्हाच ठरू शकतो!
कोणतेही गुप्त धन असो किंवा सापडलेली वस्तू असो ही सरकार जमाच केली पाहिजे. कायद्यानुसारच हे बंधनकारक आहे. मात्र अतिआशेच्या पोटी अनेकजण अशा वस्तू लपवत राहतात. वास्तविक तसे पाहता उद्योग खात्रीतून काम करत असताना असे काही सापडल्यास याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना किंवा संबंधित पीडीओ तसेच ग्राम पंचायत सदस्यांना कळविणे गरजेचे असते. मात्र गुप्तता ठेवून असा प्रकार घडल्याने हा देखील एक गुन्हाच ठरू शकतो.









