पेडणे वाहतूक कार्यालयात अर्ज स्वीकारण्यास नकार, मुख्यमंत्र्यांकडून दिशाभूल
पेडणे : मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पेडणेतील टॅक्सी व्यावसायिकांना रोजगार मिळण्याकरीता सरकारने स्टॅन्डसाठी अर्ज मागवले आहेत. या अर्जाची मुदत 9 जून ते 15 जून अशी आहे. काल परंतु अर्ज भरण्यासाठी गेलेल्या टॅक्सी व्यावसायिकांचे पेडणे वाहतूक अधिकाऱ्यांनी अर्ज स्वीकारले नाहीत. त्यामुळे टॅक्सी व्यवासायिक युवकांनी वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो आणि सरकारच्या कृतीचा पत्रकार परिषद घेऊन जाहीर निषेध करत जय श्रीरामचा नारा दिला.मोपा विमानतळावर रोजगार मिळावा या आशेने आम्ही पेडण्यातील 70 ते 80 युवकांनी नवीन टॅक्सी घेतल्या. मात्र आम्हाला आता पेडणे वाहतूक कार्यालयात अधिकारी अर्ज भरण्यास देत नाहीत. सरकारने भेदभाव न करता अर्ज घ्यावेत, असे राजू नर्से म्हणाले. दोन दिवसापूर्वी भाजपने पेडण्यात विकास प्रकल्प यात्रा काढली. त्यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बाराशे नोकऱ्या दिल्याचे सांगितले आहे. परंती त्या नोकऱ्या त्यांनी कुणाला दिल्या अशी विचारणा करून मुख्यमंत्र्यांनी लोकांची दिशाभूल करू नये. भाजपला मत पाहिजे तर आम्ही घालतो. मात्र आम्हाला मोपा विमानतळावर स्टॅन्ड द्या. आमचे अर्ज ग्राह्य धरा, असे सांगून नर्से यांनी जय श्रीराम जय श्रीराम असा नारा दिला. मोपा विमानतळासाठी जमिनी दिलेल्या भूमिपुत्र पेडणेकरांनाच सरकारने अपंग करून ठेवले आहे. विकासाच्या नावावर यात्रा काढतात आणि लोकांना भुलभुलय्या देतात. मात्र प्रत्यक्षात काहीच करत नसल्याचे यावेळी राजू नर्से यांनी सांगून सरकारच्या कृतीचा निषेध केला. सरकारने 15 जून पर्यंत आमचे अर्ज न स्वीकारल्यास आम्हाला वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल, असेही ते म्हणाले. मोपा विमानतळवर लावण्यासाठी आम्ही टॅक्सी घेतल्या आहेत. आमच्या या गाड्यांचे काय करावे ते आमदार आणि सराकारने सांगावे. त्या गाड्या ठेवाव्यात की विकाव्यात तेही सांगावे. सरकारने आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी यावेळी किरण तोरस्कर यांनी केली.









