विना हेल्मेट, विनापरवाना वाहनचालकांची धरपकड
वाळपई : बेशिस्त वाहन पार्किंगमुळे वाळपई शहरात वारंवारपणे वाहतुकीची कोंडी होत असते. याची विशेष दखल घेऊन वाहतूक खात्याच्या पोलिसांनी दोन दिवसापासून दंडात्मक कारवाई सुरू केली असून काल शुक्रवारी वाळपई शहरात वाहनधारकांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज पालिका उद्यानासमोर बेशिस्तपणे होणाऱ्या पार्किंग पासून रस्त्याने मोकळा श्वास घेतल्याचे पहावयास मिळाले. गेल्या दहा वर्षापासून शहरातील वाहतूक पार्किंग व कोंडीचा प्श्न सुटलेला नाही. हा प्रश्न सोडविण्यासाठी नगरपालिकेमध्ये अनेकवेळा बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये फक्त कागदोपत्री चर्चा करण्यात आली. मात्र त्याची अंमलबजावणी करण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. नगरपालिकेने लाखो ऊपये खर्चून दिशादर्शक व सूचना फलक लावले. मात्र याचेही पालन अजिबात होत नसल्याचे निदर्शनास येत आहे.
विद्यार्थ्यांना त्रास
या वाहतूक कोंडीचा मोठा फटका विद्यार्थी वर्गाला बसत आहे. सकाळी व दुपारी वाळपई शहरातील वाहतुकीची कोंडी दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे आपल्या मुलांना शाळेतून नेण्यासाठी व पोचविण्यासाठी येणाऱ्या पालकांना शहरांमध्ये अडकून राहावे लागते. याचा त्रास विद्यार्थ्यांना होत असल्याचे पालकांनी सांगितले.
वाहतूक पोलिसांची धडक कारवाई
दरम्यान हा प्रश्न धसास लावण्यासाठी सध्यातरी वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केलेली आहे. गेल्या दोन दिवसापासून वाळपई शहरातील मध्यवर्ती भागामध्ये बेशिस्त पार्किंग विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली. शुक्रवारी वाहतूक खात्याच्या कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पालिका उद्यानासमोर बेशिस्त वाहन पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. दरम्यान या कारवाईचे अनेक नागरिकांसह पालकांनी विशेष स्वागत केले आहे. आता शाळा सुटताना या ठिकाणी कोणत्याही प्रकारची वाहतुकीची कोंडी होणार नाही. दोन्ही बाजूने बेशिस्तपणे वाहने पार्किंग होत असल्यामुळे त्रास सहन करावा लागत होता. आता दंडात्मक कारवाईमुळे वाहतूक कोंडीचे प्रमाण कमी होणार आहे.
कारवाई सुरूच राहणार
दरम्यान या भागांमध्ये दुचाकी वाहन चालकांकडून ध्वनी प्रदूषण होते. त्याचप्रमाणे विनापरवाना दुचाकीस्वार या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. सध्या राज्यात अपघातांची मालिका सुरू झालेली आहे. यामुळे या भागांमध्ये विनाहेल्मेट विनापरवाना दुचाकी व चार चाकी वाहन चालकांविरोधात वाहतूक पोलिसांची कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. वाळपई-ठाणे मार्गावर सिटी हॉल कॉम्प्लेक्स परिसरापर्यंत दोन्ही बाजूने बेशिस्त वाहनांची पार्किंग होत असते. याठिकाणीही दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी होत आहे. त्यामुळे त्याठिकाणीही वाहनधारकांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.









