मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आवाहन
सांखळी : माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण घेऊन घरी राहण्यापेक्षा आपल्या अंगातील कलागुणांना वाव द्या. गुणात्मक शिक्षण ग्रहण करून भविष्यात संधीच्या दिशेने झेप घेणे आवश्यक आहे. स्वयंपूर्ण गोवा या कार्यक्रमांतर्गत कुशलता प्राप्त करून स्वावलंबी व स्वयंपूर्ण बनण्याचे ध्येय ठेवावे. साई नर्सिंग इन्स्टिट्यूट येणाऱ्या काळात वैद्यकीय क्षेत्रातील सर्व कोर्सेस उपलब्ध करणार असून राज्यात आयुष्य इस्पितळ झाल्यापासून या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज भासणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथे केले.
सेसा वेदांत कंपनीतर्फे साखळीतील साई नर्सिंग इन्स्टिट्यूटला सीएसआर उपक्रमाअंतर्गत आर्थिक साहाय्य करण्यात आले. रवींद्र भवनच्या डॉर्मेंटरी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास सेसा गोवा वेदांता लि.चे सिईओ नवीन जाजू, सेसा वेदांताच्या डब्लूएबीचे सिईओ, सप्तेश सरदेसाई, ईएसजीच्या प्रमुख लीना वेरेकर, साई नर्सिंग इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष पांडुरंग कुट्टीकर, आदींची उपस्थिती होती. राज्यात आयुष इस्पितळ झाल्यानंतर या क्षेत्रातील मनुष्यबळाची गरज वाढली आहे. राज्यात या क्षेत्रात व्हाईट कॉलर नोकऱ्या असून युवकांनी या क्षेत्रात पुढे यावे. राज्य सरकार व्हेलनेस पर्यटनही पुढे नेण्याच्या तयारी असल्याने अशा प्रकारच्या अभ्यासक्रमात प्रवेश करून आपले भविष्य साधावे. साई नर्सिंग इन्स्टिट्यूटचे इमारत बांधकाम सुरू असून त्यास सरकारी मदत मिळालेली नाही. भविष्यात सरकारी अनुदान मिळाल्यास यात असलेले कोर्सेस कमी शुल्कात विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करण्याची संधी आम्हाला मिळणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.
न्हावेली आमोणा या भागात कार्यरत असलेल्या सेसा वेदांत कंपनीतर्फे या भागातील पर्यावरणालाही मोठा हातभार लावण्यात येत आहे. या कंपनीकडून होण्राया प्रदुषणावरच अनेकवेळा लोक लक्ष वेधत असतात. पण न्हावेली गावातील मत्स्य पैदास वाढण्यासाठी या कंपनीने विशेष प्रयत्न करीत ‘चोणकुल’ या जातीच्या माशाची अंडी व पिल्ले पैदास करण्याचे काम हाती घेतले आहे. आमोणा येथील मुख्य कार्यालयाच्या परिसरात विविध जातीच्या कासवांचे पालन केले आहे. त्याचबरोबर साखळी मतदारसंघातील सर्ध भागांमध्ये त्यांच्याकडून पर्यावरणीय बाबतीत भरीव काम होत आहे. यावेळी सेसा वेदांता कंपनीचे सिईओ नवीन जाजू यांनी कंपनीतर्फे सामाजिक क्षेत्रात अनेक उपक्रम हाती घेतले जात असून सामाजिक व पर्यावरणीय सलोखा सदैव राखण्याचे काम कंपनी करीत आहे. या कामात सरकारचेही सहकार्य लाभत असल्याचे सांगितले. सेसा वेदांत कंपनीतर्फे सीएसआर पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. तसेच यावेळी साई नर्सिंग इन्स्टिट्यूटला आयएसओ प्रमाणपत्र बहाल करण्यात आले. पांडुरंग कुट्टीकर यांनी साई नर्सिंग इन्स्टिट्यूटची माहिती दिली. आभार लीना वेरेकर यांनी मानले.









