मंगळवार, शुक्रवार पाळण्यात येणार वार : पारंपरिक पद्धतीने सोहळा : जलाभिषेक कार्यक्रमही होणार
बेळगाव : वडगाव येथील जागृत देवी श्री मंगाई देवीला शुक्रवारी रात्री गाऱ्हाणे घालण्यात आले. आता यापुढे मंगळवार आणि शुक्रवारी वार पाळण्यात येणार आहेत. याचबरोबर मंगाई देवीसह इतर देवांना कुमारीका डोक्यावर कलश घेऊन मंगळवारी जलाभिषेक करणार आहेत. पारंपरिक पद्धतीने हा सोहळा साजरा केला जाणार आहे. शुक्रवारी रात्री मंदिरामध्ये गाऱ्हाणे घालण्यात आले. त्यानंतर मंदिरातील घंटा बांधून ठेवण्यात आली आहे. श्री मंगाई देवी ही जागृत देवी म्हणून ओळखले जाते. त्यामुळे भाविक मोठ्या भक्तिभावाने आता वार पाळणार आहेत. महिनाभर वडगाव येथील 90 टक्के नागरिक मांसाहार खाणे टाळतात. याचबरोबर नारळदेखील वाढवत नाहीत. मंगळवार आणि शुक्रवार वार पाळला जाणार असून भाविक मोठ्या भक्तीने त्या दिवशी शेतातील तसेच इतर कामेही बंद ठेवून वार पाळतात.
9 दिवस वार पाळणूक
यापुढे मंगळवार व शुक्रवार असे एकूण 9 दिवस वार पाळण्यात येणार आहेत. त्यानंतर मंगाई देवीची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही यात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या देवीचे वार तसेच आरास अत्यंत धार्मिक पद्धतीने वडगावमधील भाविक सर्व धार्मिक कार्यक्रम करतात. मंगाई देवीचा पूजेचा मान हा चव्हाण-पाटील या घराण्याला असून त्यांच्या उपस्थितीतच सर्व कार्यक्रम होतात. शुक्रवारी गाऱ्हाणे घालून पूजा, अर्चा करण्यात आली. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









