वृत्तसंस्था / नवी दिल्ली
गेल्या काही काळात मणिपूर राज्यात झालेला हिंसाचार हा कटकारस्थानाचा भाग होता काय, या प्रश्नाची चौकशी सीबीआयकडून केली जाणार आहे. केंद्रीय गृहविभगाने ही घोषणा शुक्रवारी केली. तसेच या हिंसाचारात ज्यांची हानी झाली आहे, त्यांच्यासाठी 101 कोटी रुपयांचे भरपाई पॅकेजही देण्यात येणार आहे.
नुकतीच नागा समाजाच्या नेत्यांनी अमित शहा यांची भेट घेतली होती. या बैठकीत राज्यात शांतता स्थापन करण्याच्या दृष्टीने अनेक उपायांवर चर्चा करण्यात आली. राज्यात सध्या मैतेयी आणि कुकी या दोन समाजांमध्ये संघर्ष उफाळला आहे. नागा समुदायाच्या नेत्यांनी मध्यस्थी करुन दोन्ही समाजांमधील वैमनस्य दूर करावे तसेच समझोता घडविण्यास साहाय्य करावे, अशी सूचना शहा यांनी केली, अशी माहिती नाव जाहीर न करण्याच्या अटीवर नागा नेत्यांनी दिली.
मणिपूर हिंसाचाराची सहा मोठी प्रकरणे सीबीआयकडे चौकशीसाठी देण्यात येणार आहेत. 60 सदस्यांच्या मणिपूर विधानसभेत मैतेयी समाजाचे 40 आमदार आहेत. कुकी आणि नागा समाजाचे प्रत्येकी 10 सदस्य आहेत. त्यामुळे विधानसभेत मैतेयी समाजाचे वर्चस्व असल्याचे दिसून येत आहे.









