चांदोली धरणात केवळ एक महीना पुरेल इतकाच पाणी साठा शिल्लक आहे. पाणी पातळीमध्ये दिवसेंदिवस घट होऊ लागल्याने तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जुन निम्म्यावर आला तरीही पावसाने दडी मारली असून उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होऊ लागले आहे. पिण्याचे पाणी, शेतीसाठी लागणारे पाणी तसेच विविध योजनांमार्फत चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे महिन्याकाठी आता पाच टीएमसी पाण्याचा वापर होत असून धरणांमध्ये सध्या उपयुक्त पाणीसाठा ५.१८ टीएमसी एवढाच शिल्लक आहे. त्यामुळे पुढील महिन्यापासून पाण्याची कमतरता मोठ्या प्रमाणात भासणार आहे. तर शिराळा शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या मोरणा धरणाने ही सध्या तळ गाठला आहे.
चांदोली धरण हे ३४.४० टि एम सी क्षमतेचे असुन धरणाचा मृत साठा हा ६.८८ टि एम सी इतका आहे. चांदोली धरणात सध्या १२.०६ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून यातील ५.१८ टीएमसी एवढाच पाणीसाठा उपयुक्त आहे. याच बरोबर शिराळा शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या मोरणा धरणाने ही सध्या तळ गाठला असल्याने शिराळा वासियांच्या डोक्यावर पाणी टंचाईची तलवार लटकत आहे.