खलिस्तान टायगर फोर्स विरोधात कारवाई : फंडिंग-शस्त्रतस्करीवरून चौकशी
वृत्तसंस्था/ पानीपत
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) खलिस्तान टायगर फोर्स या दहशतवादी संघटनेला वित्तपुरवठा करणाऱ्या संशयितांच्या पंजाब तसेच हरियाणामधील ठिकाणांवर मंगळवारी छापे टाकले आहेत. पंजाबमध्ये 9 तर हरियाणातील एका ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. केटीएफसाठी निधी जमविण्यासह सीमेपलिकडून शस्त्रास्त्रs, दारूगोळा अन् स्फोटकांच्या तस्करीच्या कटात सामील आरोपींवर ही कारवाई झाली आहे.
केटीएफकडून पंजाब अन् हरियाणामध्ये हल्ले घडवून आणण्याची तयारी केली जात होती. यात स्फोटांपासून टार्गेट किलिंगचा कट देखील सामील होता. केटीएफला अनेक स्थानिक हस्तक आर्थिक रसद पुरवत असल्याचे एनआयएला तपासादरम्यान आढळून आले होते. तर काही हस्तक सीमेपलिकडून शस्त्रास्त्रs अन् स्फोटकांच्या तस्करीत मदत करत होते.
पंजाबच्या श्री मुक्तसर साहिब जिल्ह्यात खेळण्यांच्या विक्रेत्यावर एनआयएच्या पथकाने कारवाई केली आहे. याचबरोबर फिरोजपूरच्या तलवंडी भाई क्षेत्रातही छापे टाकण्यात आले असून तेथून काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. या संशयितांची आता कसून चौकशी करण्यात येत आहे. हरियाणाच्या कैथलमध्ये औषधविक्रेते प्रदीप अन् कुलदीप यांच्या घरी एनआयएने छापा टाकला आहे. प्रदीप अन् कुलदीप यांच्या बँक खात्यांमधून संशयास्पद व्यवहार झाले आहेत.
केंद्रीय गृह मंत्रालयाने 4 महिन्यांपूर्वी केटीएफला दहशतवादी संघटना घोषित केले होते. खलिस्तान टायगर फोर्स ही कट्टरवादी संघटना असून तिचा उद्देश पंजाबमध्ये पुन्हा दहशतवादाचे भूत उभे करणे आहे. पंजाबमधील टार्गेट किलिंगमागे देखील याच संघटनेचा हात आहे. ही संघटना भारताचे सार्वभौमत्व, राष्ट्रीय सुरक्षेला आव्हान देऊ पाहत असल्याचे गृह मंत्रालयाने म्हटले होते.
खलिस्तान टायगर फोर्सचा म्होरक्या हरदीप सिंह निज्जर असून तो कॅनडातून कारवाया घडवून आणत आहे. सप्टेंबर 2020 मध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने निज्जरला दहशतवादी घोषित पेले होते. तसेच निज्जरची जालंधरमधी संपत्ती जप्त करण्यात आली होती.









