पुणे / वार्ताहर :
मेट्रोच्या साहित्याची चोरी करून विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या तीन महिलांसह पाच जणांना चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून मेट्रोचे चोरलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे.
अनिल सुजान काळे (वय 18), दीपक मारूती काळे (25, रा. थेरगांव) यांच्यासह तीन महिलांना अटक करण्यात आली आहे. याबाबत सुरेश लावंडे (23) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या बाणेर, बालेवाडी परिसरातील मेट्रो खांबांसाठी लागणाऱ्या लोखंडी पट्टय़ा आरोपींनी चोरुन नेल्या होत्या. अनिल व दीपक काळे हे दोघे औंधमधील ज्युपिटर रुग्णालयाच्या परिसरातील भंगार दुकानात लोखंडी पट्टय़ा विक्री करण्यासाठी आले होते. पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर दोघांना पकडले. त्यांच्या चौकशीत अन्य तीन महिलांचीही नावे समोर आली. या महिला चोरटय़ांनी गणेशखिंड रस्त्यावरील आचार्य आनंदऋषीजी चौकात सुरू असलेल्या मेट्रो कामाच्या ठिकाणावरुन सळई, नट असे साहित्य चोरले होते. या महिलांनाही अटक करण्यात आली असून, चतु:श्रृंगी पोलीस अधिक तपास करत आहेत.