चार-पाच दिवसांपासून भातपेरणीला प्रारंभ : विविध जातींच्या भातांची पेरणी : शेतमजुरांची भासतेय कमतरता
वार्ताहर /किणये
तालुक्यात धूळवाफ पेरणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची शिवारात लगबग दिसून येत आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून भातपेरणीला प्रारंभ झाला आहे. शेतकरी कुरीच्या साह्याने पेरणी करताना दिसत आहेत. तालुक्यात गेल्या आठ-दहा दिवसांपूर्वी दमदार वळीव पावसाने हजेरी लावली. त्यामुळे धूळवाफ पेरणीच्या हंगामाला जोर आला आहे. रविवारी विविध गावातील शेतकरी कुटुंबातील कामगारांना सुटी असल्यामुळे सदर कामगारवर्गही शेतशिवारात राबताना दिसून आले. मागील पंधरा दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी शेत शिवारामध्ये पेरणीपूर्व मशागतीची कामे करून शेणखत टाकण्यात आले आहे. शेतकरी कुरीचा साह्याने भातपेरणी करत आहेत. पाच आणि सात आळीच्या कुरींचा वापर करण्यात येत आहे. कुरीने भातपेरणी केल्यानंतर त्यावर बैलजोडीच्या साह्याने हंडोरे फिरवण्यात येत आहे.
शेतीकामासाठी ट्रॅक्टर भाडेही वाढले
बासुमती, इंद्रायणी, सोनम तसेच विविध जातीच्या भातांची पेरणी सध्या शेतकरी करीत आहेत. अलीकडे सर्रास भागामध्ये कारखाने तसेच रोजगाराला जाणाऱ्या महिलावर्गाची संख्या अधिक वाढली आहे. त्यामुळे पेरणी करण्यासाठी शेतमजुरांची टंचाई निर्माण झाली असल्याची माहिती शेतकरीवर्गाने दिली आहे. रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण दिसून आले. तरीही शेतकरी मात्र धूळवाफ पेरणी करण्यात मग्न होते. हवामान खात्यानेही पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे ज्या शिवारांमध्ये धूळवाफ पेरणी करायची आहे. ती कामे करताना शेतकऱ्यांची धावपळ सुरू होती. रविवारी सायंकाळी ढगाळ वातावरण अधिक झाले होते. तसेच हवामानामध्ये गारठाही निर्माण झाला होता. धूळवाफ पेरणीसह इतर पिकांच्या पेरणीसाठी मशागतीची कामे सध्या शिवारांमध्ये जोमाने सुरू आहेत. ट्रॅक्टरच्या सहाय्याने कल्टी मारणे, रोटरी फिरविणे आदी कामे सुरू आहेत. ट्रॅक्टरला प्रत्येकी एक तासाला 600 ते 650 रुपये याप्रमाणे भाडे देण्यात येत आहे. या दरात काही भागानुसार बदल होत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.









