सर्वत्र दुर्गंधी पसरत असल्याने कंग्राळी बुद्रुक नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
केंद्र सरकारने भारत देशामध्ये स्वच्छ भारत आंदोलन अभियान सुरू करून गल्ली, गाव, शहर, राज्य, देश स्वच्छ ठेवण्याचा सर्वांना संदेश दिला आहे. कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं. ने येथे कचरा टाकल्यास 500 रुपये दंड असा फलक लावूनसुद्धा नागरिक फलकाकडे लक्ष न देता रस्त्याशेजारी कचऱ्याचे ढिगारे तयार करून सर्वत्र दुर्गंधी पसरविण्याचे काम करत आहेत. याला जबाबदार नागारिकच आहेत. यामुळे नागरिकांकडूनच स्वच्छ भारत आंदोलन अभियान अयशस्वी ठरविण्याचे काम होत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया पर्यावरणप्रेमी नागरिकांतून व्यक्त होत आहेत. कंग्राळी बुद्रुक-शाहूनगर रस्त्यावर रस्त्याच्याकडेला पूर्वी नागरिकांनी कचरा टाकून ढिगारे तयार केले होते. मध्यंतरी ‘तरुण भारत’मधून प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेऊन महानगरपालिकेने हे ढिगारे हटवून जागा स्वच्छ केली. लागलीच कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं. ने सदर जागेवर येथे कचरा टाकू नये, कचरा टाकताना सापडल्यास किंवा कळविल्यास कचरा टाकणाऱ्या व्यक्तीस 500 रुपये दंड, असा फलक लावण्यात आला. फलक लावून काही नागरिकांनी पंचायतीच्या या आदेशाला डावलून कचरा टाकण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. मध्यंतरी काही कचरा टाकणाऱ्या नागरिकांना पंचायतीतर्फे दंडही ठोठावण्यात आला. परंतु पुढे नागरिकांना पंचायतीच्या या आदेशाची भीतीच राहिली नाही व सध्या सदर रस्त्याशेजारी बेधडक कचरा टाकण्याचे सत्र सुरूच आहे. परिणामी रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना मात्र दुर्गंधीमुळे नाकाला रुमाल लावून जाण्याची वेळ आली आहे.
कर महानगरपालिकेत, कचरा कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं. हद्दीत
शाहूनगर हे बेळगाव महानगरपालिकेचे उपनगर गेल्या 25 ते 30 वर्षापूर्वी तयार झाले आहे. पूर्वी या नवीन वसाहतीचे सांडपाणी कंग्राळी बुद्रुक शिवारातील सुपीक जमिनीमध्ये येत होते. शेवटी रस्त्याला शेती लागून असलेल्या शेतकऱ्यांनी रस्त्याच्या बाजूने स्वच्छ कच्ची गटार तयार करून पुढे नाल्याला मिळण्याची व्यवस्था केली. याबद्दल ‘तरुण भारत’मधून सांडपाण्याबद्दल अनेकवेळा वृत्तांकन झाले. परंतु कुणाला काही फरक पडला नाही. सध्या तर शाहूनगर परिसरातील नागरिक आपल्या घरचा कचरा व घाण साहित्य कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं. हद्दीमध्ये टाकल्यास 500 रुपये दंड असा फलक लावूनसुद्धा मनामध्ये थोडीही भीती न बाळगता कचरा टाकून पर्यावरण दुर्गंधीमय करण्याचे काम करत आहेत. यामुळे शाहूनगरवासीय कर महानगरपालिकेमध्ये भरत आहेत. परंतु त्यांची घाण कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं. कार्यक्षेत्रात नागरिक टाकत असल्यामुळे शासनाने सुरू केलेले स्वच्छ भारत आंदोलन अभियान फक्त नावापुरतेच झाल्याचे दिसून येत आहे, अशाही प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत.
कचऱ्याची उचल वेळीच होणे गरजेचे
शाहूनगर-कंग्राळी बुद्रुक रस्त्यावर कुणीही यावे आणि कचरा टाकून जावे, अशी परिस्थिती झाली आहे. प्रत्येक नागरिकाने स्वत:च्या घरापासून स्वच्छ भारत आंदोलन अभियानाला सुरुवात केल्यास गल्ली, गाव, शहर, राज्य, देश सुजलाम सुफलाम होईल. यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वत:च्या कचऱ्याची स्वत:च विल्हेवाट लावल्यास गावापासून देशभर भेडसावणारी ही कचऱ्याची गंभीर समस्या मुक्त होऊन आपला देश पर्यावरणमुक्त होईल, अशा प्रतिक्रिया अनेक पर्यावरणप्रेमी नागरिकांतून व्यक्त होताना दिसत आहेत.









