ईडीने बजावला आहे समन्स
वृत्तसंस्था/ कोलकाता
तृणमूल काँग्रेसचे महासचिव अभिषेक बॅनर्जी यांच्या पत्नी रुजिरा बॅनर्जी यांना सोमवारी सकाळी कोलकाता विमानतळावर रोखण्यात आले. दुबईला जाण्यासाठी त्या विमानतळावर पोहोचल्या होत्या. परंतु त्यांना विमानात चढण्यापासून रोखण्यात आले आहे. अभिषेक बॅनर्जी हे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे आहेत.
रुजिरा बॅनर्जी दीर्घकाळापर्यंत विमानतळावरच होत्या. तसेच त्यांनी स्वत:च्या वकिलांशी सल्लामसलत केली होती. अभिषेक बॅनर्जी आणि रुजिरा यांच्याविरोधात ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. याचप्रकरणी ईडीने रुजिरा यांच्याविरोधात लुकआउट नोटीस जारी केली आहे. रुजिरा यांच्यावर कोळा तस्करीप्रकरणी मनी लॉन्ड्रिंगचा आरोप आहे. ईडीने 8 जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना रुजिरा यांना केली आहे. याच समन्सच्या पार्श्वभूमीवर रुजिरा यांना विदेशात जाण्यापासून रोखण्यात आले आहे.









