मंत्री सुदिन ढवळीकर यांची माहिती
वार्ताहर / मडकई
फोंड्यातील वाहतूक कार्यालयाच्या बाजूला असलेला 92 हजार चौ. मिटर भूखंड माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या कार्यकाळात आपण वाहतूकमंत्री असताना हस्तंतरीत केला होता. केंद्रीय मोटार वाहन नियमा अंतर्गत “बसपोर्ट” उभारण्यासाठी ही जागा संपादीत करण्यात आली आहे. कृषीमंत्री रवी नाईक हे तिसऱ्या जिल्ह्यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. कंदब बसस्थानकाच्या जवळ असलेल्या या भूखंडापैकी 60 हजार चौ. मिटरच्या जागेत विविध सरकारी आस्थापने आणल्यास जनतेला एकाचठिकाणी सर्व सेवा उपलब्ध होती, अशी माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली.
फोंडा कदंब बसस्थानक परिसरातील रस्त्यांच्या हॉटमिक्स डांबरीकरणाला प्रारंभ केल्यानंतर ते बोलत होते. केंद्रीय मोटार वाहन नियमाची अंमल बजावणी 1984 नंतर कुणीच केली नाही. मात्र केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी वाहतुक मंत्रीपदी असताना 12 मंत्र्यांची बैठक घेऊन अंमलबजावणीला सुऊवात केली. केंद्रीय योजनेअतंर्गत गोव्यातील फोंडा, मडगाव, पणजी, म्हापसा, कुडचडे या पाच बसस्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. येत्या डिसेंबरपर्यंत या बसस्थानकाचे नूतनीकरण केले जाईल. परवान्यासाठी वाहन ट्रॅकची गरज असते. अद्ययावत यंत्रणेतून सर्व वाहनांचे पासिंग करणे व त्यांना फिटनेस दाखला देणे. या सुविधाही पुरविण्यात येतील. वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी लवकरच या योजनेला चालना देण्याची मागणी मंत्री ढवळीकर यांनी केली. यावेळी बांदोडा पंचायतीचे सरपंच सुखानंद गावडे, पंचसदस्य वामन नाईक, सोनीया नाईक, रेश्मा मुल्ला, मुक्ता नाईक, रामचंद्र नाईक, सार्वजनीक बांधकाम खात्याचे सहाय्यक अभियंते अरविंद फडते व अन्य नागरिक उपस्थीत होते.
नगरपालिका निवडणुकीमुळे हॉटमिक्स डांबरीकरण रखडले
फोंडा कंदब बसस्थानक परिसरात हॉटमिक्स डांबरीकरण महिन्याभरापूर्वीच झाले असते. पालिका निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ते लांबले. बांदोडा पंचायत क्षेत्रात येणाऱ्या या बसस्थानकाचे नामकरण फोंडा कंदब बसस्टेंड असे असल्याने निवडणूक आयोगाने खर्चाला मान्यता दिली नव्हती. म्हणून हे काम रखडल्याचे स्पष्टीकरण मंत्री ढवळीकर यांनी दिले. एकूण रु. 91 लाख खर्चून हे काम हाती घेण्यात आले आहे. सन 1991 साली रवी नाईक यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात बसस्थानक उभारण्यात आले. मात्र नऊ वर्षे त्याचा वापर झालाच नाही. आपण आमदार झाल्यानंतर अनेकांचा विरोध झुगारुन कंदब बसस्थानक वाहतुकीसाठी खुले केले. बसवाले, रिक्षावाले, मोटारचालक तसेच विविध पक्षांच्या कार्यकर्त्यानी आदोलन केले. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या सहकार्यामुळे कंदब बसस्थानक वाहतुकीस खुले झाले. कंदब महामंडळातर्फे काही लोकांना उदरनिर्वाहासाठी बारा छोटी दुकाने उपलब्ध करुन देण्यात आली. कालांतराने विरोध करणाऱ्यांनीच सहकार्य केले, असे मंत्री ढवळीकर यांनी सांगितले.