राज्यभरातील शाळा गजबजणार, सुमारे अडीच लाख मुले करणार प्रवेश
प्रतिनिधी/ पणजी
राज्याच्या शैक्षणिक वर्षास उद्या सोमवार दि. 5 जूनपासून प्रारंभ होत असून प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधून दोन ते अडीच लाख मुले शाळेत प्रवेश करणार आहेत.
सुमारे दोन महिन्यांच्या सुट्टीनंतर उद्यापासून शाळा गजबजणार असून नव्या उमेदीने मुले प्रवेश घेणार आहेत. त्यादृष्टीने मुलांनी गणवेश, दप्तर आदींची तयारी करून ठेवली आहे. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सरकारतर्फे क्रमिक पुस्तके देण्यात येतात. बहुतेक सर्व शाळांना शिक्षण खात्याने पुस्तके पुरविली आहेत. उद्यापासून त्यांचेही प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना वितरण होणार आहे.
राज्यातील अनेक शाळांना विद्यार्थी वाहतुकीसाठी सरकारतर्फे बालरथ देण्यात आले आहेत. त्यामधील काही खासदार निधीतूनही पुरविण्यात आले आहेत. त्याशिवाय विद्यार्थीसंख्या जास्त असलेल्या शाळांमध्ये कदंब महामंडळाच्या बसेस आणि खासगी मिनी बसेसचाही वापर करण्यात येतो. उद्यापासून शाळा सुरू होणार असल्याने ही सर्व वाहतूक व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे. जे विद्यार्थी यापैकी कोणत्याही व्यवस्थेचा वापर करत नाहीत त्यांना त्यांचे पालक स्वत:च्या वाहनांमधून शाळेपर्यंत सोडण्यास येतात. त्यामुळे मुलांसोबत पालकांनाही दैनदिन कामाव्यतिरिक्त ही जादा ड्युटी करावी लागणार आहे.
राज्यात प्राथमिक आणि माध्यमिक धरून अंदाजे दोन हजार विद्यालये आहेत. या सर्व विद्यालयांचे परिसर उद्यापासून मुलांची वर्दळ आणि किलबिलाटाने गजबजणार आहेत.
दरम्यान, नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या दहावीच्या निकालानंतर उच्च माध्यमिक अर्थात 11वी इयत्तेसाठी प्रवेश प्रक्रिया प्रारंभ झाली आहे. पूर्वी दहावीचा निकाल जाहीर होताच लगेचच स्वत:च्या आवडीच्या उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थी गर्दी करत असत. त्यामुळे मोजक्याच विद्यालयांना मोठ्या प्रमाणात विद्यार्थी मिळायचे व उर्वरितांची ओढाताण व्हायची. या समस्येवर उपाय म्हणून उच्च शिक्षण संचालनालयाने प्रवेश प्रक्रिया स्वत:च्या माध्यमातून चालविण्याचा निर्णय घेतला. त्याद्वारे एखाद्या गावातील विद्यार्थ्याला त्याच्या जवळच्या परिसरातील तीन विद्यालये निवडण्याचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले. त्यामधील एक त्याच्या प्राधान्याचे व उर्वरित दोन पर्यायी म्हणून निवडण्याची सोय करून देण्यात आली.
या सर्वांचा परिणाम म्हणून अनेक विद्यालयांची मक्तेदारी संपुष्टात येऊन सर्व विद्यालयांना समान विद्यार्थी मिळू लागले. मात्र या प्रक्रियेमुळे विद्यालये सुरू होण्यात किमान आठवडाभराचा कालावधी लागणार आहे. प्राप्त माहितीनुसार पुढील आठवड्यापासून 11वीचे वर्ग सुरू होणार असल्याचे समजले आहे.