तब्बल 900 प्रवासी जखमी : दोन एक्स्प्रेससह मालगाडीची धडक, पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्र्यांची घटनास्थळी भेट
वृत्तसंस्था/ भुवनेश्वर, बालासोर
ओडिशातील रेल्वे अपघात हृदय पिळवटून टाकणारा आहे. बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या रेल्वे अपघातातील मृतांची संख्या जवळपास 300 वर पोहोचली आहे. तसेच या अपघातात 900 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. बालासोर येथील बहनगा बाजार स्थानकाजवळ तीन रेल्वेंची धडक बसल्याने अलीकडच्या काळातील सर्वात भीषण अपघाताची नोंद झाली आहे. सिग्नल यंत्रणेतील बिघाडानंतर कोरोमंडल एक्स्प्रेस चुकीच्या ट्रॅकवर आल्याने ही दुर्घटना घडल्याचा दावा केला जात आहे. तथापि, या भीषण अपघाताबाबत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
कोरोमंडल एक्स्प्रेस कोलकाताजवळील शालीमार स्थानकावरून चेन्नई सेंट्रल स्थानकाकडे जात असताना बहनगा बाजार स्थानकाजवळ शुक्रवारी सायंकाळी 7.20 च्या सुमारास हा अपघात झाला. याचदरम्यान बहनगा बाजार स्टेशनच्या बाहेरील मार्गावर एक मालगाडी उभी होती. हावडाहून चेन्नईला जाणारी कोरोमंडल एक्सप्रेस येथे ऊळावरून घसरली. कोरोमंडल एक्स्प्रेसचे इंजिन आणि मालगाडी धडकल्यानंतर त्याच्या बोगी तिसऱ्या ट्रॅकवर उलटल्या. काही वेळाने तिसऱ्या ट्रॅकवर येणारी हावडा-बेंगळूर दुरांतो रेल्वेमार्गावरील एक्स्प्रेसच्या डब्यांना धडकली. तीन गाड्यांची टक्कर झाल्यामुळे 17 डबे ऊळावरून घसरले. रात्री उशिरापर्यंत मृतांची संख्या 200 च्या पुढे गेली.
अपघातानंतर तासाभराने बालासोर येथे रात्री आठच्या सुमारास रेल्वे रुळावरुन घसरल्याची बातमी आली. यानंतर दुसरी गाडी रुळावरून घसरल्याची माहिती मिळाली. रात्री दहाच्या सुमारास दोन प्रवासी रेल्वेगाड्या आणि मालगाडीची टक्कर झाल्याचे स्पष्ट झाले. सुरुवातीला 50 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती होती, मात्र सकाळपर्यंत हा आकडा 200 च्या पुढे पोहोचला. तर, शनिवार सायंकाळपर्यंत बळींचा आकडा 270 ते 280 च्या आसपास पोहोचला होता. अपघातानंतर 20 तासांनंतर म्हणजेच शनिवारी दुपारी दोन वाजेपर्यंत रेल्वेमंत्री किंवा रेल्वे मंत्रालयाने अपघाताच्या कारणाबाबत काहीही सांगितले नाही. मंत्र्यांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनीच केवळ चौकशी सुरू असल्याचे स्पष्ट केले.
अनेक गाड्या रद्द
अपघातानंतर रेल्वेट्रॅक बंद झाल्यामुळे या मार्गावरील 48 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच 39 गाड्या पर्यायी मार्गाने वळवल्या गेल्या. तर, 10 शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत. या अपघातानंतर रेल्वेने वेगवेगळ्या स्थानकांवर हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत.
पंतप्रधान घटनास्थळी, जखमींचीही विचारपूस
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी दुपारी घटनास्थळी पोहोचले. यानंतर त्यांनी ऊग्णालयात जखमींची भेट घेतली. तत्पूर्वी पंतप्रधानांनी रेल्वे अपघाताचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठकही बोलावली होती. या बैठकीला गृहमंत्री अमित शहा आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित होते. आढावा बैठकीनंतर ते अपघातस्थळी आणि कटक ऊग्णालयाकडे गेले. अनेक जखमींवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयांना भेट देत नातेवाईकांचे सांत्वन केले. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांना उपचारांबाबत काही सूचनाही केल्या.
पघाताची दाहकता…
- अपघात कधी झाला?
भुवनेश्वरपासून 175 किमी अंतरावर बालासोर येथील बहनगा बाजार स्थानकाजवळ शुक्रवारी सायंकाळी 7.20 वाजता हा अपघात झाला.
- अपघात कसा झाला?
बहनगा बाजार स्थानकाजवळ एक मालगाडी बाह्य मार्गावर उभी होती. याचदरम्यान हावडाहून चेन्नईला जाणारी कोरोमंडल एक्स्प्रेस येथे रुळावरून घसरली. हायस्पीड कोरोमंडल एक्स्प्रेसचे इंजिन मालगाडीला धडकले. त्यानंतर रेल्वेच्या बोगी तिसऱ्या ट्रॅकवर पडल्यानंतर या ट्रॅकवर भरधाव वेगाने येणाऱ्या हावडा-बेंगळूर दुरांतोने कोरोमंडल एक्स्प्रेसच्या डब्यांना धडक दिली.
अपघातस्थळी स्फोटासारखा आवाज
अपघातानंतर रात्रभर बचावकार्य सुरू होते. अपघातस्थळी स्थानिक लोक सर्वप्रथम पोहोचले. अपघातावेळी मोठा आवाज झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. हा धक्का इतका जोरदार होता की काही लोक डब्याबाहेर फेकले गेले. मोठ्या आवाजानेच काही लोक रेल्वेमार्गाच्या दिशेने धावले. काळोखामध्येच स्थानिक लोक जखमी प्रवाशांना वाचविण्यासाठी मदत करत होते. अपघाताची दाहकता वाढत चालल्यानंतर एनडीआरएफसह अन्य यंत्रणा तैनात करण्यात आल्या. ऊळावरून घसरलेल्या डब्यांमधून मृतदेह बाहेर काढण्यासाठी गॅस कटरचा वापर करण्यात आला. तसेच जीसीबीसारखी मोठमोठी यंत्रेही मागविण्यात आली. मात्र, अवघ्या काही मिनिटांमध्ये तीन ट्रेनमध्ये अपघात झाल्याची जाणीव कोणालाच आली नव्हती. रेल्वे विभागानेही रात्री उशिरापर्यंत तीन रेल्वेंच्या अपघाताची माहिती जारी केली नाही.
रात्रभर मदत-बचावकार्य
नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, ओडिशा डिझास्टर रॅपिड अॅक्शन फोर्स आणि अग्निशमन सेवा विभागाने मदत व बचावकार्यात महत्त्वाची भूमिका बजावली. रेल्वेमार्गावर विखुरलेल्या बोगी कापून जिवंत किंवा मृतांना बाहेर काढण्याचे काम रात्रभर सुरू होते, अशी माहिती ओडिशाचे मुख्य सचिव पी के जेना यांनी सांगितले. सुमारे 200 ऊग्णवाहिका, 50 बसेस आणि 45 मोबाईल हेल्थ युनिट्स, 1,200 कर्मचाऱ्यांसह, अपघाताच्या ठिकाणी कार्यरत होत्या. तसेच जखमी प्रवाशांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यासाठी दोन एमआय-17 हेलिकॉप्टर तैनात करण्यात आल्याची माहिती संरक्षण अधिकाऱ्याने शनिवारी दिली.
उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
रेल्वे मंत्रालयाकडून अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या चौकशीचे नेतृत्व दक्षिण पूर्व परिमंडळाचे रेल्वे सुरक्षा आयुक्त ए. एम. चौधरी करतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांची घटनास्थळी भेट
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि त्यांच्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याप्रमाणेच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव सकाळी घटनास्थळी पोहोचले. नवीन पटनायक यांनी राज्यात शनिवारी दिवसभराचा राजकीय दुखवटा जाहीर केला. तामिळनाडू सरकारने अडकलेल्या आणि जखमी प्रवाशांना दक्षिणेकडील राज्यात परत येण्याची व्यवस्था केली आहे आणि घटनास्थळी बचाव आणि मदत कार्यात समन्वय साधण्यासाठी मंत्री आणि अधिकाऱ्यांचा समावेश असलेले उच्चस्तरीय शिष्टमंडळ पाठवण्यात आले आहे, मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन म्हणाले.
आर्थिक मदत
रेल्वेने मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपये, गंभीर जखमींना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपये मदत जाहीर केली आहे. तसेच पंतप्रधानांच्या राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची अतिरिक्त मदत मोदींनी जाहीर केली आहे.