प्रतिनिधी,कोल्हापूर
मराठा तितुका मेळवावा प्रतिष्ठानतर्फे 350 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त किल्ले विशाळगडावर सोमवार (दि.5) व मंगळवारी (दि.6) असे दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.मुख्य सोहळ्या दिवशी छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांचे वंशज उपस्थित राहणार आहेत,अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष रणजित घरपणकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
घरपणकर म्हणाले,गेल्या तीन वर्षांपासून विशाळगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचे आयोजन केले जात आहे.हा सोहळा लोकसहभागातून साजरा होत असून त्याला आता मोठे स्वऊप प्राप्त झाले आहे. 350 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त संघटनेतर्फे गडावर शिवस्मारक निर्माण करण्यासाठी राजवाडा परिसरात शिवराज्याभिषेक दिनाचे विविध विधी पार पडणार आहेत.
ते पुढे म्हणाले,गडावर सोमवारपासून विविध कार्यक्रमांना सुऊवात होणार आहे.दुपारी 12 वाजता पावनखिंड पुजन होणार आहे.दुपारी 2 वाजता शिवशाहीर संदीप चौगुले (इंगळी) यांचा पोवाडा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी 5 वाजता मुंडा दरवाजा येथे ध्वजारोहण व गडपूजन होईल.सायंकाळी 6 वाजता या ठिकाणी आतषबाजी, सायंकाळी7 वाजता स्फुर्तीगीत व पोवाडा कार्यक्रम त्यानंतर रात्री 8.30 वाजता राजवाडा व भगवंतेश्वर मंदीराजवळ आतषबाजी करण्यात येणार आहे.
मंगळवारी (दि.6) सकाळी 6 वाजता राजवाडा परिसरात नवचंडी यज्ञ,होम व पुजा होणार आहे.गड पायथ्याला सकाळी 7 ते 8 दरम्यान क्रांतीवीर फिरंगोजी शिंदे मर्दानी आखाडा यांचे शिवकालिन युध्दकलेचे प्रात्यक्षिक व पारंपारिक हलगीवादन होणार आहे.सकाळी 8 वाजता मान्यवरांच्या हस्ते पालखीपूजन होणार आहे.यानंतर ही पालखी नकाशा बोर्ड, बाजारपेठेकडून गडावरील भोसलेवाडी,भगवंतेश्वर मंदीर येथे नेण्यात येणार आहे.या ठिकाणी सकाळी 9 वाजता शिव उत्सवमुर्तीची विधीवत पुजा गंगा जल व दुग्धाभिषेकाने होणार आहे. यानंतर 10 वाजून 10 मिनिटांनी उत्सवमुर्तीवर नाण्यांचा अभिषेक होणा आहे. यानंतर मान्यवरांचा सन्मान व मनोगत सोहळा होणार आहे. दुपारी 12 वाजता मंदीर परिसरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी योगेश केरकर,अनिल चिले,ऋषिकेश देसाई,विनायक करंबे,विनायक मांजरेकर आदी उपस्थित होते.