पुणे / प्रतिनिधी :
जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी राज्यातील काही जिह्या?चे नामांतर करण्यात येत आहे, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवारी राज्य सरकारवर केला. महापुरूषांच्या नावे शहर ओळखले जावे यामध्ये कोणतेही दुमत नाही. महापुरूषांचे स्मरण तसेच त्यांच्या विचाराचा प्रसार होणे आवश्यक आहे. मात्र, ते करत असताना राजकीय स्वार्थ डोळय़ासमोर ठेवू नये, असेही त्यांनी नमूद केले.
गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड तोलणार पगारदार नोकरांची सहकारी पतसंस्थेच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमानंतर पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.
पवार म्हणाले, नामांतराबाबत काय निर्णय घ्यावा हा सरकारचा अधिकार आहे. सध्यस्थितीत अहमदनगरचे नामांतर व्हावे यासाठी कोणतेही आंदोलन पेटले नव्हते, तसेच मोठय़ा प्रमाणावर मागणी देखील होताना दिसून येत नव्हती. मात्र, सध्याच्या सरकारमधून महापुरूषांबद्दल वारंवार बेताल वक्तव्य करण्यात आली. त्यामध्ये वाचाळवीरांची आणखी भर पडली. यापुर्वी सत्तेत असताना सरकारने धनगर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला होता. तो पुर्णत्वास न गेल्याने सरकारने नामांतरणाचा मुद्दा पुढे आणला आहे. अहमदनगरला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव मिळाले यांचे स्वागत आहे.
मुंबई येथील जे. जे. रुग्णालयाच्या प्रमुख काही डॉक्टरांनी राजीनामा दिला आहे. तसेच, तेथील डॉक्टर सामुहिक संपावर गेल्याने रुग्णांना याचा फटका बसत आहे. सरकारने यावर मार्ग काढणे आवश्यक आहे. मात्र, मार्ग काढण्यासाठी सरकार कमी पडत असल्याचे दिसून येते. ही बाब अतिशय गंभीर असून डॉक्टरांचे म्हणणे ऐकून घेण्याची गरज आहे. पुणे लोकसभेची पोटनिवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. तसेच आगामी लोकसभा निवडणूकांसाठी महाविकास आघाडीत कुठल्या जागा कोणाला वाटय़ाला येतात, हे प्रथम निश्चित होईल. राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणाऱ्या जागेवर सक्षम उमेदवार दिला जाईल, असेही पवार म्हणाले.








