बाची येथील नागरिकांमध्ये संताप : आरोग्याला धोका पोचणाऱ्या तांदळाबाबत चौकशीची मागणी
वार्ताहर /उचगाव
बाची येथे नागरिकांना दिलेल्या रेशनच्या तांदळामध्ये प्लास्टिकचे तांदूळ आढळल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, बाची येथील अनेक नागरिकांनी रेशन दुकानातून रेशनचे तांदूळ आणले होते. तांदूळ पाहिल्यानंतर काही जणांना संशय येताच त्यांनी या तांदळाची पाहणी केली असता तांदळामध्ये प्लास्टिकचे तांदूळ असल्याचे आढळून आले. यासंदर्भात येथील नागरिकांनी दैनिक तरुण भारतशी संपर्क साधून वरील माहिती दिली आहे. नागरिकांना मिळणाऱ्या रेशनच्या तांदळामध्ये अशा प्रकारे भेसळ होत असेल तर तो तांदूळ नागरिकांनी खायचा कसा असा प्रश्न उपस्थित होत आहे. गोरगरीब जनतेसाठी शासनाकडून तांदूळ दिले जातात. मात्र त्यामध्ये अशा प्रकारची भेसळ होत असेल तर नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोकाही निर्माण होण्याची शक्यता आहे. यासाठी शासनाने तातडीने यावर उपाययोजना कराव्यात व ज्या रेशन दुकानातून सदर तांदूळ आला त्या तांदळाबाबत चौकशी करावी आणि नागरिकांच्या आरोग्याला पोचणारा धोका टाळावा अशी मागणी बाची ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे.









