ऑन्कोलॉजिस्ट डॉ. शेखर साळकर यांचे मत
पणजी : आज विविध प्रकारे तंबाखूचे सेवन केले जाते. युवापिढीने तसेच लोकांनी तंबाखू खाण्यापेक्षा सात्विक आहार घेणे आवश्यक आहे. तंबाखू हे एका स्लो पॉयझन आहे जे हळुहळु माणसाच्या शरीराला पोखरत जाते. तंबाखूचा परिणामाबाबत अजूनही लोक अनभिज्ञ आहेत. पोलिस फक्त गांजा, चरस जप्त करण्याकडे लक्ष देतात. परंतु जे तंबाखू सेवन करतात त्यांच्यावर काहीच कारवाई केली जात नाही. विद्यार्थी हे लगेच व्यसनाधीन होतात. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. त्यांना व्यसनाधीन होण्यापासून वाचविणे आवश्यक असल्याचे मत डॉ. शेखर साळकर यांनी व्यक्त केले. प्रजापिता ब्रह्मकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या गोवा शाखेतर्फे पणजी कदंब बसस्थानक येथे जागतिक तंबाखू प्रतिबंध दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना केले. यावेळी व्यासपीठावर मणिपाल हॉस्पिटलचे ऑन्कोलॉजिस्ट डॉ. शेखर साळकर, ‘तरुण भारत’चे गोवा आवृत्ती संपादक सागर जावडेकर, कदंब महामंडळाचे सरव्यवस्थापक संजय घाटे, साहाय्यक सरव्यवस्थापक भिकाजी फडते, एसपीएमए शिवेंद्र भूषण, ब्रह्मकुमारीजच्या निर्मला बेहन उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांच्याहस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. तंबाखूचे सेवन करणे हे जास्त धोकादायक आहे. जो कुणी धूम्रपान करतो त्यावर प्रतिबंध आणण्याकरिता कायदे आले आहेत. गोव्यात फक्त 10 टक्के धूम्रपान करणारे आहेत. परंतु 9.5 टक्के धूम्रपान हे 15 वर्षावरील युवा करतात. त्यामुळे त्यांच्यावर अधिक लक्ष देणे गरजेचे आहे असे साळकर म्हणाले.
गोव्यात तंबाखू व तंबाखूसारख्या पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण कमी झाले असले तरी पूर्णत: बंद झाले नाही. अजूनही तंबाखू, गुटखाची विक्री बंदी असतानादेखील केली जाते. आजची युवापिढी ही व्यसनाधीन होत चालली आहे. सामाजिक संस्थांनी पुढे येऊन गुटखा, तंबाखू, सिगरेट ओढू नये आणि ते आपल्या आरोग्यासाठी किती हानीकारक याची जागृती करणे आवश्यक आहे. पालकांनीसुद्धा तंबाखूचे सेवन करणे बंद करणे गरजेचे आहे. युवापिढी विविध व्यसनांच्या अधीन होत आहेत. हे कुठेतरी थांबणे आवश्यक आहे. व्यसन थांबली नाही तर युवापिढी नक्कीच फसतील. यासंदर्भात जनजागृती होणे गरजेचे आहे असे सागर जावडेकर पुढे म्हणाले. कदंबा बसवर तंबाखू किंवा सुपारीबद्दल जाहिरात लावण्यावर विविध स्तरावर बोलले जात आहे. परंतु लगेचच अधिकृतरित्या या जाहिराती बंद करण्यात येणार आहेत. याशिवाय लवकरच जाहिरात काढण्यात येईल. 2002 साली बसस्थानकावर मोठ्या प्रमाणात सिगरेट ओढण्याचे प्रकार दिसून येत असत. परंतु आता हेच प्रकार कमी झाले आहेत असे कदंबाचे सरव्यवस्थापक संजय घाटे यांनी यावेळी सांगितले. यावेळी एसपीएमए शिवेंद्र भूषण यांनी तंबाखू, सिगरेटचे सेवनाबद्दलचे दुष्परिणाम व कायदे याविषयी माहिती दिली.