बिहार, कर्नाटक, केरळमध्ये कारवाई
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारच्या फुलवारीशरीफ येथील पीएफआयच्या कनेक्शनप्रकरणी एनआयएने बुधवारी बिहार, कर्नाटक आणि केरळमधील 25 ठिकाणी छापे टाकले आहेत. एनआयएच्या पथकाने कटिहार येथील मुजफ्फर टोला येथे ही कारवाई केली आहे. एनआयए पथकाने दहशतवादी नासिर हुसैनच्या घराची झडती घेतली आहे. तर एनआयएने एका आरोपीला ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत असले तरीही याची अधिकृत स्वरुपात पुष्टी झालेली नाही.
जुलै 2022 मध्ये पाटण्याच्या फुलवारीशरीफमध्ये पोलिसांच्या छाप्यादरम्यान पीएफआयशी निगडित काही लोकांना अटक करण्यात आली होती. या कारवाईदरम्यान इंडिया 2047 नावाचा 7 पानी दस्तऐवज हस्तगत करण्यात आला होता. या दस्तऐवजात पुढील 25 वर्षांमध्ये भारताला इस्लामिक राष्ट्रात बदलण्याचे प्लॅनिंग नमूद होते. या प्लॅनिंगनुसार मुस्लीम तरुणांना शस्त्र हाताळणीचे प्रशिक्षण देण्यात येत होते.
चालू वर्षी 4-5 फेब्रुवारी रोजी एनआयएने बिहारच्या मोतिहारी येथील 8 ठिकाणी छापे टाकले होते. तर दोन जणांना अटक केली होती. या आरोपींनी हत्या घडवून आणण्यासाठी शस्त्रास्त्रs अन् दारूगोळ्याची व्यवस्था केली होती. 12 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाटण्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान हल्ला करण्याचा त्यांचा कट होता. या प्रकरणाचा तपास हाती घेतल्यावर एनआयएने धडक कारवाई सुरू केली आहे.