कुणाच्या गळ्यात पडणार माळ? : जाधव, सूर्यवंशींचा ‘विजय’ होणार की जाधवांचा ‘दीपक’ उजळणार यावर नजरा : इच्छुकांसह समर्थकांकडून ‘प्रदेश’वर फिल्डिंग
कोल्हापूर संजीव खाडे
भाजपच्या कोल्हापूर शहर अध्यक्षपदी कुणाची निवड होणार? या बद्दल कार्यकर्त्यांसह शहरातील नागरिकांत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे निकटवर्तीय विजय जाधव यांच्यासह खासदार धनंजय महाडिक यांचे समर्थक असणारे आणि महापालिकेतील नगरसेवकपद, स्थायी समितीपद आणि विरोधीपक्ष नेतेपदाचा प्रदीर्घ अनुभव असणारे विजय सूर्यवंशी यांच्यात शहराध्यक्षपदासाठी प्रचंड चुरस असल्याचे सांगितले जात असताना महाडिक यांचे कट्टर समर्थक असणारे माजी महापौर दीपक जाधवही आता अध्यक्षपदाच्या रिंगणात पूर्ण ताकदीने उतरले आहेत. त्यातच माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांनीही फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे शहर भाजपमध्ये जुन्या-जुन्या पदाधिकाऱ्यांबरोबर नव्या-नव्या पदाधिकाऱ्यांत आपापले घोडे पुढे दामटण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.
विद्यमान शहराध्यक्ष राहुल चिकोडे यांची मुदत संपल्यानंतर आता भाजपला आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा निवडणुका डोळ्या समोर ठेवून नवा शहराध्यक्ष निवडावा लागणार आहे. जिल्ह्यातील भाजप मंत्री चंद्रकांतदादा पाटील चालवित असले तरी गेल्या वर्षी राज्यसभेवर खासदार म्हणून निवड झालेल्या धनंजय महाडिक यांनाही पक्षाने ताकद दिली आहे. भविष्यात त्यांच्याकडे जिल्ह्याच्या अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या देण्याचे संकेतही पक्ष नेतृत्वाने दिले आहेत. त्यामुळे कोल्हापूर शहरचा अध्यक्ष निवडताना चंद्रकांतदादा यांच्याबरोबरीने खासदार धनंजय महाडिक यांच्या मतालाही बहुमोल असणार आहे. पण चंद्रकांतदादांचा शब्द प्रमाण मानून राजकीय वाटचाल करणारे खासदार धनंजय महाडिक शहराध्यक्ष निवडीत आपले वजन कुणाच्या पारड्यात टाकतात याकडे भाजप कार्यकर्त्यांच्या नजरा आहेत.
दोन आठवड्यापूर्वी शहराध्यक्ष निवडीसाठी पक्ष निरीक्षक माजी खासदार अमर साबळे यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यावेळी त्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांची, भाजप, ताराराणीच्या शहरातील माजी नगरसेवकांची मते देखील जाणून घेतली होती. त्यांनी आपला अहवाल प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. दरम्यान, विजय जाधव यांच्यासाठी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी तर विजय सूर्यवंशी यांच्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी जोर लावल्याची भाजप कार्यकर्त्यांत चर्चा आहे. महाडिक यांचे कार्यकर्ते असणारे आणि चंद्रकांतदादांच्या पदवीधर निवडणुकीपासून त्यांच्याबरोबर असणारे माजी महापौर दीपक जाधव यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. राजारामपुरी भागातील चार पाच प्रभागात त्यांचे वर्चस्व आहे. त्याचबरोबर विधानसभा पोटनिवडणुकीत त्dयांनी भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांना काँग्रेस उमेदवाराविरोधात साडेसहाहजाराचे मताधिक्य दिल्याचा दावा त्यांनी पक्ष नेतृत्वाकडे करत आपण पक्ष वाढीसाठी सक्षम असल्याने संधी देण्याची विनंती केली आहे. या तिघांत चुरस असताना माजी नगरसेवक अजित ठाणेकरही आपल्या संधी मिळावी, यासाठी आग्रही आहेत. त्यांनी आपल्या कार्याचा अहवाल सादर केला आहे. इतरांप्रमाणे ठाणेकर यांनीही प्रदेश भाजपवरील नेत्यांशी संवाद साधल्याचे सांगितले जाते.
जुने-जुने आणि नवे-नवे यांच्यात स्पर्धा
विजय जाधव आणि अजित ठाणेकर यांची गणना भाजपच्या जुन्या पदाधिकाऱ्यांत होते. तर विजय सूर्यवंशी हे महापालिकेच्या निमित्ताने महाडिक यांच्याबरोबर भाजपमध्ये दाखल झाले होते. माजी महापौर दीपक जाधव हे अजूनही महाडिक यांच्या गटात आहेत. महाडिक यांच्याबरोबर आहेत, म्हणून ते भाजपमध्ये आहेत. त्यामुळे शहराध्यक्षपदासाठी जुने-जुने आणि नवे-नवे असणाऱ्यांत स्पर्धा सुरू आहे. त्यात बाजी कोण मारणार? याकडे भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
सोशल मीडियावर बातम्यांची पेरणी
शहराध्यक्षपदाच्या मुलाखतीनंतर इच्छुक अॅक्टीव्ह झाले आहेत. काही इच्छुकांनी तर आपल्या समर्थकांच्या माध्यमातून इतर इच्छुकांपेक्षा आपण कसे शहराध्यक्षपदासाठी लायक आहोत. आपले सामाजिक, राजकीय योगदान याविषयी माहिती सोशल मीडियावरून व्हायरल करताना बातम्यांची पेरणी सुरू केली आहे. काही इच्छुकांचे यापूर्वीचे काळे, गोरे कारनामेही काही जुन्या कार्यकर्त्यांच्या कॉमेटस्च्या माध्यमातून व्हायरल होत आहेत. त्यामुळे कधी नव्हे ती शहराध्यक्षपदाची निवड चर्चेचा विषय बनली आहे.
ऐनवेळी सर्वांना नाना करत कदमांना संधी ?
विजय जाधव, विजय सूर्यवंशी, दीपक जाधव आणि अजित ठाणेकर यांच्या नावावर एकमत झाले नाही तर ऐनवेळी भाजपकडून विधानसभेची पोट निवडणूक लढविलेले महापालिकेतील ताराराणी आघाडीचे माजी गटनेते आणि महाडिक यांचे नातेवाईक सत्यजित उर्फ नाना कदम यांना संधी दिली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त होते आहे.