रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यामध्ये एका अल्पवयीन मुलावर अत्याचार करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपीला न्यायालयाने दोषी ठरवत ३६ वर्षीय आरोपीला दहा वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. हा महत्वपुर्ण निकाल पनवेल येथील न्यायालयात देण्यात आला.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, देविदास महादेव मोकल असे या आरोपीचे नाव आहे. हा आरोपी खालापूर तालुक्यातील खोपोली येथील साईबाबा नगर परिसरात राहणारा आहे. तसेच पिडीत मुलगा देखील त्याच ठिकाणचा रहिवासी आहे. त्याने त्या मुलावर अनैर्सिग अत्याचार केले. याबाबत मुलाने आपल्या घरातील मंडळींना ही माहिती दिली. त्यांनी तातडीने खोपोली पोलीस ठाणे गाठले. अत्याचार करणाऱ्या देविदास मोकल याच्याविरोधात तक्रार केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीसांनी तातडीने गुन्हा दाखल करून आरोपी देविदास मोकल याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी करून तपास पुर्ण करण्यात आल्यानंतर त्याच्याविरोधात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले.
या खटल्याची सुनावणी विशेष न्या.एस.एस. शेख यांच्या न्यायालयात झाली. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. प्रतिक्षा वडे-वारंगे यांनी काम पाहिले. पिडीत मुलगा, तपासिक अंमलदार यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. त्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित शिंदे, पैरवी अधिकारी दिक्षा राठोड, पोलीस शिपाई यांचे सहकार्य मोलाचे ठरले. तसेच तपासिक अंमलदार कल्लुरकर यांचा तपास महत्वपुर्ण ठरला. ॲड. प्रतिक्षा वडे-वारंगे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत देविदास मोकल याला दहा वर्षे सक्त मजूरी व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.