आजच्या वेगवान आणि बेभरवशाच्या जगात, दैनंदिन दिनचर्या ही संकल्पना एककल्ली किंवा प्रतिबंधात्मक वाटू शकते. जोखमीचे आयुष्य जगणे हा एक नवीन टेंड बनला आहे. ज्यामुळे लोक नित्यक्रमात अडकू इच्छित नाहीत. असे अनेक
प्रसिद्ध चित्रपट आहेत जे कोणत्याही नियमांचे बंधन नसलेल्या मुक्त जीवनाचा पुरस्कार करतात. ‘ये जवानी है दीवानी’ या चित्रपटामध्ये बनी नावाच्या मुलाची भूमिका रणबीर कपूरने निभावली आहे. त्यात आयुष्याबद्दल वेगवेगळा दृष्टिकोन असणारी माणसं दाखवली आहेत. बनी हा खूप मनमोकळ्या स्वभावाचा, घर संसारात न अडकणारा मुलगा दाखवला आहे, ज्याला पूर्ण जग फिरायची इच्छा असते. दीपिका पडुकोणने नैना नावाच्या मुलीची भूमिका गाजवली आहे. ती एक डॉक्टर असते आणि तिच्यासाठी आपले घर, काम, परिवार आणि मित्रच सगळ्यात जास्त महत्त्वाचे असतात.
दोघांच्या या भिन्न स्वभावामुळे त्यांच्यात भरपूर मतभेददेखील होतात. पण पूर्ण सिनेमा बघताना आपल्याला बनीच्या मुक्त आयुष्याची अत्यंत ओढ वाटू लागते. बंधनरहित आयुष्य कधीही आकर्षक वाटते पण ते बंधनरहित आहे म्हणून ते आदर्श आयुष्य आहे असे नाही. म्हटलं तर नियमावर आधारित जीवनशैली कंटाळवाणी वाटू शकते, पण आयुष्यात नियम आणि शिस्त नसेल तर जीवनात गोंधळ वाढू शकतो. यश मिळविण्यासाठी, आयुष्यात समतोल राखण्यासाठी आणि वैयक्तिक विकासासाठी एक व्यवस्थित दैनंदिन दिनचर्या असणे आवश्यक आहे.
माणसाचे मन खूप गुंतागुंतीचे आहे. त्याच्या मेंदूची काय क्षमता आहे हे अजून त्यालादेखील कळलेले नाही. कित्येक विचार, अनुभव, कल्पना दर क्षणाला आपल्या डोक्यातून ये जा करत असतात. भगवद्गीतेच्या अध्याय 6 श्लोक 35 मध्ये म्हटले आहे, श्रीभगवानुवाच । असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् । अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते ।।35।। याचा अर्थ असा की ‘भगवान श्रीकृष्ण म्हणतात ‘हे कुंतीपुत्र, तू जे म्हणतोस ते बरोबर आहे. मनाला आवर घालणे खरंच खूप कठीण आहे. परंतु सराव आणि अलिप्ततेने, ते नियंत्रित केले जाऊ शकते.’ जेव्हा आपण जीवनात एक विशिष्ट दिनचर्या लागू करतो, तेव्हा आपल्या मेंदूला विचलित न होण्यासाठी आणि एका ध्येयावर केंद्रित राहण्यासाठी प्रशिक्षण मिळते.
जर आयुष्यात कोणताही नियम किंवा दिनचर्या नसली तर एखाद्याचे मन विचलित होऊन त्याचे त्याच्या ध्येयाकडे दुर्लक्ष होऊ शकते. पण एका नियोजित दिनचर्येने माणसाचे मन अधिक शिस्तबद्ध आणि जागरूक होते. जेव्हा त्याला त्याच्या सभोवतालची जाणीव असते तेव्हा तो योग्य निर्णय घेऊ शकतो ज्यामुळे त्याला जीवनात प्रगती करण्यास मदत होते.
त्याचबरोबर, माणसाचे आयुष्य आजकाल घड्याळाच्या काट्याला बांधले गेले आहे. वेळ खूप कमी आहे आणि माणसाची स्वप्ने आणि जबाबदाऱ्या त्यापेक्षा कित्येक पटीने मोठ्या आहेत. अशा वेळेचा सदुपयोग करणे अत्यंत आवश्यक आहे. वेळेचा योग्य वापर करायचा असेल तर मन जागृत असणे महत्त्वाचे आहे. जर आपण मनाला विशिष्टवेळी विशिष्ट कार्य करण्यासाठी प्रशिक्षित केले तर, बाकीचा पूर्ण वेळ आपल्या हातात राहतो ज्यात आपण आपल्या आवडीच्या गोष्टी करू शकतो. साधी गोष्ट म्हणजे जर शरीराला आणि मनाला पहाटे लवकर उठायची सवय लावली, तर दिवस लवकर सुऊ होतो आणि हातात कामे करायला पुरेपूर वेळ मिळतो.
दैनंदिन दिनचर्या आपल्या कल्याणासाठी गेम-चेंजर असू शकते. जेव्हा आपण आपल्या दिनचर्येत निरोगी सवयींचा समावेश करतो तेव्हा आपण आपल्या शरीरावर आणि मनावर भरपूर प्रेम करतो. नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि पुरेशी झोप हे सर्व निरोगी आयुष्याचा भाग आहेत. व्यायामामुळे मेंदूमध्ये एन्डॉर्फिन सोडले जातात, ज्यामुळे आपण स्वत:ला जगाचा नायकदेखील समजू लागतो. मुद्दा असा आहे की एन्डॉर्फिनमुळे मन आनंदी, ताजे आणि तल्लख राहते. योग्य खाल्ल्याने तुमच्या शरीराला चांगल्या पदार्थांसह इंधन मिळते. दिनचर्या एक विशिष्ट जीवनशैली निर्माण करण्यास मदत करते. विशिष्ट निरोगी जीवनशैली जीवनात गुणवत्ता प्रदान करते. नियमित व्यायामामुळे तुमचे शरीर स्वत:ला तंदुऊस्त करते आणि तुम्हाला उत्कृष्ट कार्यक्षमतेत कार्यरत ठेवते. विश्वास ठेवा, जेव्हा तुम्हाला आतून आणि बाहेरून चांगले वाटते तेव्हा आयुष्य खूप गोड होते.
जीवन तणावपूर्ण असू शकते परंतु दैनंदिन दिनचर्या पाळल्याने आपल्याला शांत होण्यास आणि तणाव कमी करण्यास मदत होऊ शकते. जेव्हा आपली दिनचर्या ठरलेली असते तेव्हा आपल्याला माहिती असते की काय अपेक्षित आहे. दिनचर्या आपल्या जीवनात स्थिरता आणि नियंत्रणाची भावना आणते. पुढे काय होणार आहे याची आपल्याला सतत काळजी करण्याची गरज नाही.
दैनंदिन दिनचर्या हे एक शक्तिशाली साधन आहे जे व्यक्तींना त्यांच्या जीवनावर नियंत्रण ठेवण्यास, उत्पादकता वाढविण्यास आणि संपूर्ण कल्याण वाढविण्यास सक्षम करते. रचना प्रदान करून, कार्यक्षमतेला चालना देऊन आणि कार्य-जीवन समतोल वाढवून, दिनचर्या आम्हाला आमची उद्दिष्टे साध्य करण्यात, तणाव कमी करण्यात आणि आमच्या दैनंदिन क्रियाकल्पांमध्ये पूर्तता शोधण्यात मदत करतात. आपल्या जीवनात शिस्त समाविष्ट केल्याने एक सकारात्मक परिवर्तन घडते जे सर्व क्षेत्रांमध्ये उमटते, वैयक्तिक आणि व्यावसायिक यशासाठी ती एक आवश्यक सराव बनवते.
आता ‘ये जवानी है दिवानी’मध्ये बनी जो मनमोकळे नियमरहित आयुष्य जगतो ते बरोबर आहे का, की नैना जी नियमानुसार आधारित जीवनशैली जगते ते बरोबर? खरंतर यातले दोघेही बरोबर नाहीत किंवा चूकही नाहीत. मनमोकळे आयुष्य नक्कीच असावे. त्याने माणसाला एक स्वातंत्र्याची भावना मिळते, पण त्याच स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतला जाऊ नये म्हणून त्याला थोडी दिनचर्येची आणि नियमाची साथ मिळाली तर एक मुक्त, संतुलित आणि आनंदी जीवन नक्की जगता येईल!
-श्राव्या माधव कुलकर्णी