कोल्हापूर प्रतिनिधी
बाराव्या वित्त आयोगातील तरतुदीनुसार खुपीरे (ता. करवीर) ग्रामपंचायत हद्दीतील दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत संजय कांबळे घर ते काशिनाथ कांबळे घर हा 130 मीटरचा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करण्याची तरतूद सन 2010-11 मध्ये केली होती. सदर रस्त्याच्या ठिकाणी प्रत्यक्षात 80 मीटरचे खडीकरण व डांबरीकरणचे काम संबंधित ठेकेदाराने केलेले आहे. मात्र 130 मिटरच्या कामाचे बिल संबंधित ठेकेदारास अदा केला आहे. यामध्ये 50 मीटर रस्त्याची चोरी झाल्याचे चौकशी अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे संबंधित दोषी अधिकाऱ्याला बडतर्फ करावे, या मागणीचे निवेदन मनसेच्या शिष्टमंडळाच्यावतीने सीईओ संजयसिंह चव्हाण यांना दिले.
मनसेचे शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले व जिल्हा सचिव प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी जिल्हा परिषदेमध्ये जोरदार निदर्शने करण्यात आली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत थेट सीईओ संजयसिंह चव्हाण यांच्या दालना प्रवेश केला. यावेळी त्यांनी सीइओ चव्हाण यांना निवेदन देऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी चालढकल केली जात असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
निवेदनात म्हटले आहे, रस्त्याच्या चोरीबाबत तक्रार केली असता तत्कालिन गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत खुपिरे यांच्याकडे केलेल्या कारवाईचा अहवाल मागविला होता. या अहवालामध्ये ग्रामपंचायत खुपिरे यांच्यातर्फे ग्रामविकास अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष विवादीत जमिनीवर भेट देऊन मोजणी केली. सदरचा ग्रामपंचायत रस्ता रजिस्टरला 130 मीटर खडीकरण व डांबरीकरण अशी नोंद असल्याचे मान्य करून प्रत्यक्षात कामाची मोजणी केली. यावेळी 80 मीटरचा रस्ता झाल्याचे 17 ऑक्टोबर 2022 रोजीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या अहवालात नमूद केले आहे. याचाच अर्थ 50 मीटरचा रस्ता चोरीला गेल्याची प्रत्यक्ष कबूली ग्रामविकास अधिकारी अत्तार यांनी दिली आहे.
यावेळी बोलताना राजू दिंडोर्ले म्हणाले, शासनामार्फत 130 मीटरचा रस्ता प्रस्तावित मंजूर करून जिल्हा परिषद प्रशासनामार्फत 130 मिटरची बिले मंजूर करून सदर ठेकेदारास 130 मिटरचे बिल अदा करण्यात आलेले आहे. मात्र प्रत्यक्षात जागेवर केवळ 80 मिटरचे खडीकरण व डांबरीकरण झालेले आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत 4 नोव्हेंबर 2022 रोजी निवेदन देण्यात आलेले होते. या निवेदनावर गेल्या 7 महिन्यांपासून कोणतीही कारवाई केलेली नाही. ग्रामपंचायत रजिस्टरमध्ये चुकीच्या बाबींची नोंद घालणे, ग्रामपंचायत दप्तरामध्ये भ्रष्टाचाराने खाडाखोड करणे, कमी दर्जाचा व कमी अंतराचा रस्ता करून त्यामध्ये ढपला पाडण्याचे काम केल्याबद्दल व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (सन 1959 चा मुंबई अधिनियम क्र. 3) चा राजरोस भंग केल्याबद्दल महाराष्ट्र नागरी सेवा कायदा 1979 व उचित कायद्यांद्वारे
खुपीर ग्रामविकास अधिकारी तबस्सुम अत्तार, तिवले व सन 2010 ते आजतागायत खुपिरे ग्रामपंचायतीमधील सर्व ग्रामविकास अधिकाऱ्यांविरूध्द फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना त्वरीत बडतर्फ करावे, अशी मागणी निवेदनामध्ये केली आहे.