वारणानगर / प्रतिनिधी
तक्रारदार यांचे सेवानिवृत्ती नंतर रजा रोखीकरण प्रस्ताव विना त्रुटी मंजूर करतो म्हणून २५ हजाराची लाच स्विकारताना हातकंणगले तालुक्यातील पारगाव ग्रामीण रुग्णालयाच्या चालकासह मुलास कोडोली ता. पन्हाळा येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणी कोडोली पोलीस ठाण्यात तिघावर गुन्हा दाखल झाला आहे.
विलास जिवनराव शिंदे, वय -५७ , चालक ग्रामीण रुग्णालय पारगाव, त्यांचा मुलगा शिवम विलास शिंदे, वय – २२, दोघेही रा. सरकारी हॉस्पिटल कॉलनी पारगाव यांना अटक झाली असून यातील मुख्य आरोपी उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर कार्यालयातील सहायक अधीक्षक मारुती परशुराम वरुटे यांनाही अटक करण्यात आली आहे.
सहायक अधीक्षक मारुती परशुराम वरुटे यानी तक्रारदार यांचे सेवानिवृत्त नंतर रजा रोखीकरण प्रस्ताव विना त्रुटी मंजूर करतो म्हणून तीस हजार रू.ची मागणी तक्रारदार यांचेकडे केली होती. तडजोडी अंती या कामासाठी २५ हजार रू. घेण्याचे ठरले. त्याप्रमाणे दाखल तक्रारीची पडताळणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवार दि. २९ रोजी केली होती.
मारूती वरुटे यानी तडजोडीत ठरलेली रक्कम विलास जिवनराव शिंदे यांना स्विकारण्यास सांगीतली. आज मंगळवार दि. ३० रोजी शिंदे यानी मुलगा शिवम मार्फत रक्कम कोडोली येथे स्विकारताना दोघाना रंगेहाथ पकहून अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर कार्यालयाचे पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे, पो.हे.कॉ. विकास माने, सुनिल घोसाळकर, पो.कॉ. रुपेश माने, मयूर देसाई, चा.पो.हे.कॉ.विष्णु गुरव यांच्या सापळा पथकाने पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.