आळसंद/वार्ताहर
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आळसंद शाखेत खातेदारांना आवश्यक रक्कम देण्यास अधिकारी टाळाटाळ करत आहेत.नोटाच उपलब्ध नसल्याचे कारण सांगितले जात असून संपूर्ण जिल्ह्यात या एकाच शाखेत नोटांचा कायम तुटवडा कसा असतो असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. खरीप तोंडावर असताना शाखाधिकाऱ्याच्या उर्मट बोलण्याने आणि आपलेच पैसे मागण्यासाठी झिंगावे लागत असल्याने खातेदार शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
उपलब्ध माहितीनुसार आळसंद शाखेत ४१ कोटीच्या ठेवी असून १७ हजार खातेदार आहेत.या ४१ कोटी ठेवी पैकी अंदाजे २१ कोटी रुपये हे खातेदारांच्या बचत खात्यावर आहेत.दोन कोटी रुपये करंट खात्यावर आहेत.उर्वरित रक्कम कायम ठेवी आहेत असे असताना शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत खातेदार शेतकऱ्यांनी स्वतःचे ठेवलेले पैसे बँक देण्यास नकार देत आहे. अधिकारी उर्मट भाषा वापरत आहेत आणि खातेदाराचे पैसे खातेदाराला देताना पदरचे पैसे देत असल्याप्रमाणे बोलत आहेत. यामुळे हजारो कोटी रुपयांच्या ठेवी असणाऱ्या आणि जवळपास दोनशे शाखा असणाऱ्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची मोठ्या प्रमाणावर बदनामी होत आहे.
खरीप आणि लग्नसराईच्या लगबगीत तातडीने हाती पैसा असावा म्हणून मध्यवर्ती बँकेत शेतकरी पैसा ठेवतात. गावातील शाखेतून लगेच पैसे काढता येतात हा त्यामागे हेतू असतो.पण आळसंद शाखेत तेवढाच नोटांचा तुटवडा भासत आहे. मग ही बँकेची रोकड जाते कुठे ? याचा शोध जिल्हा बँकेच्या कार्यकारी संचालकांनी घेण्याची आवश्यकता आहे.
शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये पाहिजे असतील तरीही शाखाधिकारी सूर्यवंशी पैसे नाहीत म्हणून सांगत आहेत. एवढे पैसे कशाला पाहिजेत?पैशाचे काय करणार आहेस,पैसे पाहिजे असतील तर तालुक्याच्या ठिकाणी जाऊन काढ अशी उलट सुलट उत्तरे दिली जात आहेत.हा प्रकार वारंवार घडू लागल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.
प्रशांत कदम हा खातेदार आपले पैसे काढण्यास बँकेत गेला असता त्याला अपमानास्पद वागणूक दिली गेली.तू कुणालाही फोन कर.माझे कोण वाकडे करू शकत नाही.तू बँकेत पैसे ठेवले आहेत म्हणून उपकार केले नाहीस.मिळतील तेवढेच पैसे घे असे बोलून खातेदाराला पटवण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे खातेदारांनी जेव्हा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रधान शाखेत सांगलीला फोन लावला तेव्हा मात्र निमुटपणे पैसे दिले गेले.
ऊस उत्पादक शेतकरी स्वतःच्या खात्यावर पाच दहा लाख रुपये ठेवत असतात.अचानक होणाऱ्या खर्चाची ही रक्कम ठेवली जाते.मात्र बँकेतील रोख रक्कम कमी झाली तर पुन्हा नवे टारगेट पूर्ण करावे लागेल म्हणून असा प्रकार केला जातो की खरोखरच बँकेच्या या शाखेत रोकड कमतरता जाणवत आहे? याचा शोध कार्यकारी संचालकांनी घेण्याची आवश्यकता आहे.जिल्हा बँकेच्या शाखेत पन्नास हजार रुपये सुद्धा नाहीत असा जर बाहेर गवगवा झाला तर त्याचा परिणाम बँकेतील ठेवी काढून घेण्यावर होऊ शकतो याची साधी जाणीव नसलेल्या शाखाधिकार्यांच्या या उपद्व्यापाला लगाम घालावा आणि त्यांच्या हातातील रोकड नेमकी जाते कोठे याची पडताळणी विशेष पथक पाठवून केली जावी अशी शेतकऱ्यांमधून मागणी होत आहे.