पुणे / वार्ताहर :
पुणे शहरात शिक्षणासाठी आलेल्या तरुणीने प्रियकराचा चाकूने भोसकून खून केला. या घटनेत प्रियेसीही गंभीर जखमी झाली असून, तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यशवंत मुंडे (वय 22, मूळ रा. लातूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर अनुजा पन्हाळे (21, मूळ रा. अहमदनगर) असे जखमी तरुणीचे नाव आहे.
लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशवंत मुंडे आणि अनुजा पन्हाळे हे दोघेही वाघोली परिसरातील रायसोनी कॉलेजमध्ये डेटा सायन्स या अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होते. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. सध्या परीक्षा असल्याने ते दोघे एकत्रित अभ्यास करत होते. रविवारी रात्री अनुजा ही यशवंत मुंडे याच्या रायसोनी कॉलेज जवळच्या खोलीवर अभ्यास करण्यासाठी आली होती. दरम्यान, सोमवारी पहाटे या दोघांमध्ये वादविवाद झाले. या वादाचे रुपांतर भांडणात झाले. याच भांडणातून तरुणीने चाकूने यशवंतवर वार केले. यात यशवंतचा मृत्यू झाला. यावेळी झालेल्या झटापटीत अनुजाही जखमी झाली.
घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मयत यशवंत मुंडे याचा मृतदेह ताब्यात घेऊन ससून रुग्णालयात शवविचछेदनासाठी पाठवला तर, अनुजा हिला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले. याबाबतचा पुढील तपास लोणीकंद पोलीस करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी दिली.