ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्याच्या कल्याणीनगर परिसरातील मारीगोल्ड आयटी पार्कमध्ये एका इमारतीला भीषण आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 4 गाडय़ा घटनास्थळी दाखल झाल्या असून, इमारतीत अडकलेल्या 40 कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे. इमारतीच्या सहाव्या मजल्यावर आणखी काही कर्मचारी अडकले असून, त्यांना बाहेर काढण्याचे तसेच आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम शर्थीने सुरु आहे.
मारीगोल्ड आयटी पार्कमधील बहुमजली इमारतीला आज दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. आगीमुळे धुराचे लोट संपूर्ण इमारतीत पसरले. त्यामुळे इमारतीमधील अनेक कर्मचाऱ्यांनी जीव वाचविण्यासाठी गच्चीवर धाव घेतली. तर 40 ते 50 जण या आगीमुळे इमारतीत अडकून पडले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची उंच शिडीची ब्रॉन्टो आणि 4 बंब घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवत असतानाच त्यांनी इमारतीत अडकेल्या 40 कर्मचाऱ्यांची सुखरुप सुटका केली. तर इमारतीच्या सहाव्या मजल्यावर काही लोक अडकले असून, त्यांना बाहेर काढण्याचे अग्नीशमन दलाचे प्रयत्न सुरु आहेत. या आगीत दोन जण किरकोळ जखमी झाले असून, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.







