अभिनेत्री हुमा कुरैशीचा चित्रपट
महिलाकेंद्रीत चित्रपट मागील काही काळापासून थेट ओटीटीवर प्रदर्शित केले जात आहेत. या यादीत आता आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे. हुमा कुरैशीचा आगामी चित्रपट ‘तरला’ आता थेट ओटीटीवर झळकणार आहे. प्रसिद्ध शेफ तरला दलाल यांच्या आयुष्यावर आधारित आणि हुमा कुरैशीची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट ओटीटीवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
पीयूष गुप्ता यांच्याकडून दिग्दर्शित या चित्रपटाची निमिर्ती रॉनी स्क्रूवाला, अश्विनी अय्यर तिवारी आणि नीतेश तिवारी यांनी केली आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म झी5 वर प्रदर्शित होणार आहे. परंतु चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

या चित्रपटात हुमा ही शेफ तरला दलाल यांची व्यक्तिरेखा साकारताना दिसून येणार आहे. हुमाने या बायोपिकचे चित्रिकरण पूर्ण केले आहे. तरला दलाल या फूड रायटर आणि गुजराती खाद्यपदार्थ विषयक तज्ञ होत्या. त्यांनी तरला दलाल शो आणि कुट इट अप विथ तरला यासारख्या शोंचे सूत्रसंचालन केले होते. शेफ तरला दलाल यांना 2007 मध्ये पद्मश्रीने गौरविण्यात आले होते.
हुमा आगामी काळात ‘तरला’सोबत ‘पूजा मेरी जान’ या चित्रपटात देखील दिसून येणार आहे. या चित्रपटातही हुमा मुख्य भूमिकेत आहे. तिच्यासोबत या चित्रपटात सनी सिंह आणि सोनाली सहगल हे कलाकार दिसून येणार आहेत. यापूर्वी हुमा ‘मोनिका ओ माय डार्लिंग आणि ‘डबल एक्सएल’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.









