सरकारकडून धोरण अधिसूचित : सध्या 15 वर्षांवरील 2 लाख वाहने
पणजी : गोवा सरकारने 15 वर्षे झालेली नोंदणीकृत वाहने भंगारात काढण्याचे धोरण अधिसूचित केले असून ते पुढील पाच वर्षांसाठी लागू राहणार आहे. त्याची कार्यवाही आता सरकारतर्फे सुरू करण्यात येणार आहे. सध्या गोव्यात 15 वर्षे झालेली सुमारे 2 लाख वाहने आहेत. ती या नवीन धोरणानुसार भंगारात टाकण्यात येणार असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. पुढील पाच वर्षांत सुमारे 3.50 लाख वाहने 15 वर्षे पूर्ण करणार असून ती भंगारात काढावी लागणार आहेत. त्यात व्यावसायिक वाहनांचा मोठा वाटा असल्याचे सूत्रांनी नमूद केले. या धोरणानुसार 15 वर्षांची किंवा त्यापेक्षा जुनी वाहने प्रदूषण करतात म्हणून त्यांची नोंदणी रद्द कऊन ती मोडीत काढणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रदूषण कमी होणार असल्याचा दावा अधिसूचनेतून करण्यात आला आहे. अशी वाहने लोकांनी वापऊ नयेत. त्याऐवजी पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहने घ्यावीत. 15 वर्षांची वाहने आढळली तर वाहन चालकास जबर दंडाचा फटका बसणार आहे.









