वार्ताहर /दाभाळ
बेतोडा निरंकाल पंचायत क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांवर दिशादर्शक फलक उभारण्याची मागणी नागरिक व वाहनचालकांकडून केली जात आहे. या पंचायत क्षेत्रातील बहुतेक ग्रामीण भागात येत असल्याने विविध वाड्यावस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर दिशादर्शक फलक नसल्याने अनोळखी वाहनचालकांचा गोंधळ उडतो. काही वर्षांपूर्वी पंचायतीने बऱ्याच अंतर्गत रस्त्यांवर दिशादर्शक फलक उभारले होते. त्यामुळे नवीन वाहनचालकांना नियोजित ठिकाणी जाण्यास अडचण होत नव्हती. कालांतराने हे दिशादर्शक फलक गायब झाले. काही मोडून जमिनीवर पडले आहेत तर काही खराब झाले आहे. त्याजागी नवीन दिशादर्शक फलक उभारण्याची तसदी पंचायतीने घेतलेली नाही. नवीन पंचायत मंडळाच्या कार्यकाळात मागील तीन ग्रामसभांमध्ये ग्रामस्थांनी सातत्याने हा विषय मांडला आहे. त्यावर उत्तर देताना सरपंचांनी सर्व अंतर्गत रस्त्यावर दिशादर्शक फलक उभारण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप एकाही रस्त्यावर नवीन दिशादर्शक फलक दिसत नाही. पावसाळ्यापूर्वी हे फलक उभारण्याची मागणी केली जात आहे.









