महिला बालसंगोपन खात्याच्या दवाखान्यावर केवळ कन्नड भाषेत फलक : नूतन आमदारांच्या भूमिकेकडे तालुक्याचे लक्ष
खानापूर : खानापूर येथे नव्याने बांधण्यात आलेल्या महिला बालसंगोपन दवाखान्यावर कन्नड भाषेत फलक लावण्यात आलेला आहे. तालुक्यात 80 टक्के मराठी भाषिक असल्याने या ठिकाणी मराठीतही फलक लावण्यात यावा. नव्याने निवडून आलेले आमदार विठ्ठल हलगेकर यांनी याबाबत ठोस भूमिका घेऊन मराठीत फलक लावण्याची सूचना आरोग्य अधिकाऱ्यांना करावी, अशी मागणी होत आहे. खानापूर शहरात नव्याने 15 कोटी खर्चुन नव्याने 60 खाटांचा महिला आणि बालसंगोपन दवाखाना बांधण्यात आलेला आहे. या दवाखान्याचे काम पूर्ण झाले असून दवाखान्याचे उद्घाटन येत्या काही दिवसात होणार आहे. त्याबाबत या दवाखान्याच्या अंतर्गत असलेली कामे पूर्ण करण्यात येत आहेत. तसेच या दवाखान्यावर नव्याने कन्नड फलक नुकताच लावण्यात आलेला आहे. याबाबत तालुक्यातील मराठी भाषिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. तालुक्यात 80 टक्के मराठी भाषिक आहेत. ग्रामीण भागातील जनतेला कन्नड येत नसल्याने या ठिकाणी मराठी भाषेतही फलक लावण्यात यावा, अशी मागणी होत आहे. नूतन आमदार विठ्ठल हलगेकर यांनी याबाबत गांभीर्याने लक्ष घालून तातडीने आरोग्य प्रशासनाला मराठी फलक लावण्यास भाग पाडावे, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहे.
सर्व कार्यालयांवर मराठी फलक लावा
नूतन आमदार हे मराठी भाषिक आहेत. त्यांनी तालुक्यातील मराठी भाषा, संस्कृती संवर्धनाची जबाबदारी स्वीकारुन तालुक्यातील सर्व शासकीय इमारतीवर मराठी फलक लावण्याची सूचना करावी, अशी मागणी मराठी भाषिकांतून होत आहे. निवडणुकीच्या प्रचारातून मराठी अस्मिता, मराठी संस्कृती तसेच शिवरायांची गाथा आळवणाऱ्यांनी मराठी भाषा जपण्याची आपली जबाबदारी या कृतीतून दाखवून द्यावी, अन्यथा मराठी भाषेवरील बेगडी प्रेम दिसून येईल, अशी तीव्र प्रतिक्रिया मराठी भाषिकांतून व्यक्त होत आहे.








