शेतकऱ्यांचे प्रादेशिक आयुक्तांना निवेदन
बेळगाव : वळिवाने दडी मारली आहे. तसेच उष्माही वाढला आहे. त्यामुळे पाण्याची समस्या गंभीर बनत चालली आहे. गोकाक, रायबाग, जमखंडी, मुडलगी या तालुक्यांमध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून तातडीने घटप्रभा कालव्यांतून हिडकल जलाशयामधून पाणी सोडावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी प्रादेशिक आयुक्तांना निवेदन दिले. पाटबंधारे खात्यालाही निवेदन देण्यात आले आहे. गोकाक, रायबाग, जमखंडी, मुडलगी या तालुक्यामधील गावांना पाण्याची समस्या गंभीर बनत चालली आहे. पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे तातडीने पाणी सोडावे, अशी मागणी करण्यात आली आहे. हिडकल जलाशयामध्ये पाणी असून घटप्रभा कालव्यातून पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे आता पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. तातडीने पाणी सोडावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. प्रादेशिक आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. प्रादेशिक आयुक्त एम. जी. हिरेमठ यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर पाटबंधारे खात्यालाही निवेदन देण्यात आले. शेतकरी आंदोलन करत असल्यामुळे सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या मोर्चामध्ये चुन्नाप्पा पुजेरी, एम. जी. अळगुंडी, के. जी. मेगीनाळ, एम. के. कल्लोळी, बी. ए. पाटील, एस. बी. अरबली, एस. एस. पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








